सावंतवाडी
वीट व्यवसायासाठी कामगार पुरविण्याच्या निमित्ताने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून मारहाण करून
सुशांत आप्पासो खिल्लारे (२६, रा. पंढरपूर) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर अखेर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासह अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, डांबून ठेवणे असे कोणीही दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास उपविभाय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गुरुवारी या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी स्थानिक पोलिसांसह आंबोली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, गुरुवारी पहाटे मृत सुशांत खिल्लारेचे नातेवाईक सावंतवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित झाले. त्याचे आजोबा कल्याण रणदिवे ( रा. मोहोळ ) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असा लेखी अर्ज पोलिसांना सादर केला. त्यानंतर शवविच्छेदनाअंती खिल्लारे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
वीट व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून
पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मारहाणीतील मुख्य संशयित आरोपी भाऊसो माने याने आपला मावस भाऊ तुषार पवार याला सोबत घेत मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याला आंबोली येथील खोलदरीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नात मृतदेह फेकत असताना भाऊसो माने हा देखील पाय घसरून दरीत पडला. यात त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील दुसरा संशयित तुषार पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर बुधवारी भाऊसो माने यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.
मात्र, सुशांत खिल्लारे याचे नातेवाईक बुधवारी उपस्थित झाले नव्हते. अखेर गुरुवारी पहाटे खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाले त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे अपहरण करणे, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यासह ॲट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
या प्रकरणात मृत सुशांत खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडी पोलीस ठाण्यात आले मात्र त्यांनी आपला आणखी कोणावर संशय नसून अन्य कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याने हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली असल्याने आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.