वेंगुर्ले
तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या ८७ पिल्लांना आज जीवदान मिळाले. वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांची उपस्थिती या पिल्लांना सुरक्षित रित्या समुद्रात सोडण्यात आले.
वेंगुर्ले तालुक्यामधील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीचा हंगाम चालू झाला आहे. आज पर्यंत किनारपट्टीवर तब्बल ७४ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातील वायंगणी साळगावकरवाडी येथील श्री. प्रकाश नारायण साळगावकर यांनी १२ डिसेंबरला ह्या हंगामातील पहिले समुद्री कासव ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे घरटे सुरक्षित केले होते. त्यातून आज २ फेब्रुवारीला ८७ पिल्ले घरट्यातून बाहेर आली. ही पिल्ले वनक्षेत्रपाल, कुडाळ श्री. अमृत शिंदे यांच्या उपस्थितीत सुरक्षित समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली. त्यावेळी श्री. प्रकाश साळगावकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगावकर, श्री. सावळा कांबळे वनपाल मठ, श्री सुर्यकांत सावंत वन रक्षक मठ, श्री. शंकर पाडावे, वनसेवक मठ, श्री. अमित रोकडे आणि श्री. दिगंबर तोरस्कर, प्रकल्प समन्वयक, वेंगुर्ला आदी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी सावंतवाडी वन विभाग मार्फत उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील समुद्र किनारी समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्याचे काम चालू आहे.