You are currently viewing शिवसेनेच्या नेत्याची भर चौकात हत्या…

शिवसेनेच्या नेत्याची भर चौकात हत्या…

एकाच दिवशी दोन हत्येने लोणावळा शहरात माजली खळबळ…

 

लोणावळा :

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास लोणावळ्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर तीन गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्याने लोणावळा शहर संपूर्णपणे हादरले आहे. तर दुसर्‍या घटनेत याच शहरातील हनुमान टेकडी येथे गणेश नायडू या युवकाचाही रविवारी रात्री दहाच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या दोन्ही घटनेमुळे लोणावळा शहर हादरले असून दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे.

 

आज सकाळी राहुल शेट्टी हे त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्‍यांनी तीन गोळ्या घालून त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्नात आले.

 

राहुल शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची ही ३० ते ३५ वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घृण हत्या झाली. राहुल यांच्या पश्चात त्याच्या पत्नी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.

 

तर दुसरीकडे, याच दिवशी रविवारी दसऱ्याच्या रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे गणेश नायडू या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून, या घटनेत खुनी हल्ला करणाराही गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा एक हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी हल्लेखोरावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांचा लोणावळा शहर पोलीस तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा