सावंतवाडी
आर्थिक देवघेवीच्या वादातून कराड येथे खून करण्यात आलेल्या मुकादम सुशांत खिल्लारे यांचा मृतदेह आंबोली घाटात ढकलण्याच्या प्रयत्नात भाऊसो माने हा स्वतः घाटात कोसळला. त्यामुळे माने मृत्यू प्रकरणात कोणताही घातपाताचा संशय नाही. तर याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान खिल्लारे याचा खून झाला असला तरी त्याच्या घातपाताबाबत त्याच्या नातेवाईकाकडून अद्याप कोणतीही फीर्याद देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुर्तास या प्रकरणी खूनाचा कोणताही गुन्हा पोलिसात दाखल नाही. मात्र या प्रकरणात वापरण्यात आलेली चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे, अशी माहीती सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
आंबोली घाटात काल दोन मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबख उडाली होती. मात्र कराड येथील संतोष खिल्लारे याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले होते. परंतू त्याच्या समवेत घाटीत मृतावस्थेत आढळून आलेला माने हा नेमका घाटात पडला कसा ? याबाबत पोलिस अधिक माहीती घेत होते. त्याला त्याचाच सोबती तुषार पवार याने ढकलले असावे ,असा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार आज दिवसभर चौकशी करण्यात आली. परंतू खिल्लारे याचा मृतदेह दरीत ढकलत असताना माने हा पुढे होता. त्यावेळी त्याचा तोल जावून तो दरीत कोसळला असल्याची कबूली त्यांनी दिली आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार घडल्यानंतर माने याचे नातेवाईक आज सावंतवाडी दाखल झाले. हा सर्व प्रकार लक्षात घेता आपली कोणतीही तक्रार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांनी माने याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खिल्लारे याचे नातेवाईक उशिरा पर्यत सावंतवाडीत पोचले नाहीत. त्यांनी आपण सकाळ पर्यत येतो, असे सांगितले होते. परंतू काही अडचण आल्यामुळे ते पोहोचले नाहीत. उशिरा पर्यत आपण पोहोचू ,असा त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे कोणाचीही तक्रार नसल्यामुळे पुढील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तुर्तास आम्ही ताब्यात असलेल्या पवारकडे चौकशी करीत आहोत. गुन्हा दाखल नसल्याने त्याला अटक करू शकत नाही, असे मेंगडे म्हणाले.