*महिला बचत गटांना केलं जातंय टार्गेट*
सावंतवाडीतील मंगळसूत्र चोरीच्या पार्श्वभूमीवर गावागावात लोकांनी सजग आणि जागृत राहणे की काळाची गरज बनते आहे. आत्मेश्र्वर मंदिर भागात भरदिवसा एका महिलेला संमोहित करून मंगळसूत्र लंपास करताना हाती दगड भरलेली पुडी देत चोरांनी हातोहात फसविले.
सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये औषध कंपनीची जाहिरात आणि विक्री करून भरपूर मोबदला कमावण्याचे आमिष दाखवत एक पुरुष व महिला अशा दोन अज्ञात व्यक्ती फिरत आहेत. ठाणे येथील कंपनीचा पत्ता असलेले ओळखपत्र घेऊन फिरणारी ही दोघही गावागावांतील महिला बचत गटांच्या महिलांशी संपर्क साधून त्यांचे मेळावे घेत आहे. महिलांना आपल्या कंपनीचे ओळखपत्र दाखवून आयुर्वेदिक उपचारा बाबत माहिती देऊन औषधांच्या बाटल्या विकत आहेत. सव्वाशे ते सहा हजार रुपये किमतीची औषधे सदरच्या व्यक्ती विक्री करत असून ज्या कंपनीच्या नावे विक्री सुरू आहे ती कंपनी हयात आहे का…? आयुर्वेदिक औषधांच्या नावावर विक्री होत असलेली औषधे हेल्थ ॲडवायसर (एम.आर.) ला विक्री करण्याची परवानगी आहे का…? विक्री केलेल्या औषधांचा दुष्परिणाम झाल्यास त्याला जबाबदार कोण…? असे मेळावे घेऊन गावोगावी फिरणाऱ्या लोकांनी कोणाच्या घरी लुटमार केली तर…? अथवा इतर वाईट घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची…? गावातील सरपंच, पोलिस पाटील याबद्दल झोपेचे सोंग घेऊन का राहतात…? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आयुर्वेदिक औषधांच्या विक्री, प्रसार, प्रचाराच्या नावावर फिरणाऱ्या लोकांची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक बनले आहे. अन्यथा जिल्ह्यात असेच बाहेरून आलेले लोक चोरी, लुटमार करून पळून जातील, जनता लुटली जाईल आणि प्रशासन मात्र वराती मागून घोडे नाचवित फिरेल.