*जनरल इन्शुरन्स पेन्शनर्सधारकांचा मुंबई धरणे आंदोलनात निर्णय*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने निवृत्ती वेतनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान येथे दिवसभर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले त्याला निवृत्तीधारकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान या आंदोलनची दखल घेण्याचे आवाहन संघटनेचे चेअरमन काका सामंत यांनी केले असून दुर्लक्ष झाले तर देशभरातील हे निवृत्त कर्मचारी १४ मार्च रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे धडक देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवृत्तीवेतन ही सुविधा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून केवळ कर्मचारी नव्हे तर त्यांच्या पत्नीला आयुष्याच्या उत्तरार्धात एक आधार आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यात वाढ करण्याची आहे. सध्या मिळणारे निवृत्ती वेतन तुटपुंजे असून २ हजार रुपयांपासून आहे. महागाईचा विचार करता या रकमेत भागवणे दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत सरकारने विचार करण्याची गरज आहे, असेही काका सामंत यांनी या धरणे आंदोलनात बोलताना सांगितले.
सध्या जनरल इन्शुरन्स कर्मचाऱ्यास मिळणारी फॅमिली पेन्शन १५ टक्के असून ती अत्यंत तुटपुंजी आहे. तरी केंद्र सरकारच्या धर्तीवर ती ३० टक्के इतकी असावी. जानेवारी २०२० मध्ये मुंबई आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर अर्थ मंत्रालयाने ती ३० टक्के इतकी करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्यामुळे आता ती कृतीत आणणे गरजेचे आहे, असे संघटनेचे जनरल सेक्रेटरी उदयन बॅनर्जी यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी बोलताना सांगितले की, या आंदोलनाची दखल सरकारने त्वरित घ्यावी, कारण देशभरात याबाबत तीव्र भावना आहे. आंदोलनात जमलेल्या पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांची हतबलता समजून घेण्याची गरज आहे. त्यांना न्याय देणे हे सरकारचे कर्तव्य तर आहेच परंतु अन्य प्रलंबित प्रश्नदेखील तत्काळ सोडविण्याची आवश्यकता आहे. बँकेच्या पेन्शनधारकांची मागणी मान्य झाली परंतु इन्शुरन्स पेन्शनधारकांचा प्रश्न प्रलंबितच आहे. ही मागणी तर मान्य व्हावी तसेच इन्शुरन्स पॉलिसीची टर्म्समध्ये देखील सुधारणा व्हावी, हेही या धरणे आंदोलनाचे प्रयोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात सतीश शेंडे, हेमंत मांढरे, सतीश मालपात, ललित सुवर्णा, नंदिनी कुर्दुळे, एम. के. राऊत, जयश्री देसाई इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.