You are currently viewing चिंतन

चिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*चिंतन ….*

स्वत:च निर्माण कराव्या स्वत:च्या वाटा
रस्त्यात आला हो पायाखाली जरी काटा
एका दमात उपसावा नि द्यावा फेकून दूर
आणू नये नयनी उगाच आसवांचा पूर…

सुखदु:खे समेकृत्वा जरी नाही जमले खूप
आपण कुठे संत आहोत? वाटायला अप्रूप
सामान्यासारखेच वागावे आणू नये अवसान
उगीचच निघून जाते अंगातले मग त्राण …

ठेच लागल्यावरती मात्र थोडा विचार करावा
मूर्खासारखे वागू नये थोडा धडा घ्यावाच
इतरांनी हसण्याआधी आपण आपले सावरावे
काही घडले नाहीच असे सहजपणे वावरावे…

पळसाला पाने तिनच हो मातीच्याच चुली
चकवा येतोच कधी तरी पडतात रानभुली
शांतपणे बसूनच प्रश्न मग सोडवावा
प्रश्नांचा गुंता पहा कशास उगाच वाढवावा?

समाधान नसतेच मनी तीच तर गोम आहे
तरी सारे म्हणतातच आमचे सारे क्षेम आहे?
आपण होत हो मिळवा हसा हो खोटे खोटे
मोडू द्यात कुणाला मोडायची तर बोटे ?

चित्ती असू द्यावे पहा नित्य थोडे समाधानं
गुणगुणत बसावं मनात आवडलेलं गाणं
तेवढ्याने ही निघून जातात नैराश्याचे पहा ढग
आणि थांबते आपसूक मनाची ती तगमग ….

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७ जानेवारी २०२३
वेळ : रात्री ९/४४

प्रतिक्रिया व्यक्त करा