सुरक्षेसाठी आल्याचे भासवत घातला महिलेला गंडा
सावंतवाडी
‘आत्मेश्वर मंदिराजवळ पोलीस उभे आहेत, तेथे काहीतरी चोरीचे प्रकार सुरू आहेत, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी इथे आलो आहोत. काकी तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र माझ्या हाती द्या, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल.. ‘ असे सांगून महिलेने गळ्यातून काढून दिलेले मंगळसूत्र कागदात ठेवल्याचे भासवत महिलेच्या हातात कागदाची पुडी देऊन चोरटे पसार झाले. पुडी उघडून बघितल्यावर मंगळसूत्राच्या जागी दगड गोटे पाहिल्यावर महिला हादरून गेली. चित्रपटात किंवा एखाद्या क्राईमच्या मालिकेत शोभेल असा हा प्रकार सोमवारी भर दिवसा आत्मेश्वर मंदिर लगतच्या परिसरात घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
सावंतवाडी शहरातील आत्मेश्वर मंदिर रस्त्यावर सोमवारी दुपारी १२:२५ च्या सुमारास हा प्रकार घडला. सावंतवाडी शहरातील रहिवासी असलेल्या अनुराधा अशोक सापळे या महिलेला दोन युवकांनी लुबाडले. वृद्ध असलेल्या अनुराधा सापळे यांचा साध्या, भोळ्यापणाचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांना गंडा घातला. त्यानंतर त्यांच्या बाजूला असलेले माजी शिक्षक वाय. पी. नाईक यांच्याजवळ त्या महिलेने सदर घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर तेथे आजूबाजूच्या नागरिकांनी महिलेला धीर देत पोलिसांना फोन केला.
दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत चौकशी सुरू केली आहे. तर दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या प्रसंगाने सावंतवाडी चर्चेला एकच ऊत आला असून नागरिकांमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराबद्दल रोष निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकारावर नियंत्रण आणावे तसेच नाकाबंदी करून सदर युवकांना जेरबंद करावे व संबंधित गरीब महिलेचे मंगळसूत्र तिला प्राप्त करून द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.