You are currently viewing भारत न्यूझीलंड मालिका १-१ बरोबरी

भारत न्यूझीलंड मालिका १-१ बरोबरी

*भारताचा टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर ६ विकेट्स राखून विजय*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठीचे शंभर धावांचे लक्ष्य भारताने १९.५ षटकांत ४ बाद १०१ धावा करीत साध्य केले.

 

विजयासाठी निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल (९ चेंडूंत ११) चौथ्या षटकात बाद झाला. त्यानंतर इशान किशन (३२ चेंडूंत १९) धावबाद झाला. अकराव्या षटकात ईश सोधीने राहुल त्रिपाठीला (१८ चेंडूंत १३) झेलबाद केले. १०.४ षटकांत भारताची अवस्था ३ बाद ५० अशी झाली. वॉशिंग्टन सुंदर (९ चेंडूंत १०) धावबाद झाला. ७० धावांत चार फलंदाज गारद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (३१ चेंडूंत नाबाद २६) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (२० चेंडूंत नाबाद १५) यांनी भारताचा विजय साकार केला. पण खरंतर भारतीय संघानेच विजय कमालीचा अवघड बनवला.

त्याआधी, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉन्वे धडाकेबाज सुरुवात करणार, असे वाटत असतानाच अॅलन (१० चेंडूंत ११) तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. विशिष्ट अंतराने फलंदाज बाद होत राहिले. न्यूझीलंडला निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने संघात कोणताही बदल केला नाही. भारतीय संघाने उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली.

सूर्यकुमार यादवला (३१ चेंडूंत नाबाद २६) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना १ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. भारत ह्या सामन्यासह मालिका जिंकणार का ह्याचे उत्तरही मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा