You are currently viewing ती हवा अन् तो वारा

ती हवा अन् तो वारा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री आशा भावसार लिखित अप्रतिम ललित लेख*

*ती हवा अन् तो वारा*

*ती अलवार प्रेमाची फुंकर*
*ती मंद झुळूक शितल शांत*
*तो मदमस्त बेभान वारा*
*रौद्ररुपी न ठेवी कशाची भ्रांत*

ती म्हणजे सांजवेळी मंदिराच्या गाभाऱ्यात मंद मंद तेवणारी अखंड ज्योत….आपल्याच प्रकाशात सतत हसत खेळत गोड स्मित हास्याची उधळण करून वातावरण प्रफुल्लित करणारी …नाचत बागडत हळुवार अंतरंगात प्रवेश करून शांत शितल सुखद गारवा देऊन त्यांच्या तनामनाला भुरळ पाडणारी….तिची एक साद जणू बासरीची मधुर धून… दमून भागून मार्ग क्रमण करणाऱ्या वाटसरूंची जणू नवसंजीवनीच ती… सागर किनारी पहिल्याच भेटीत प्रेमाची ओढ लावणारी …. प्रणयाची होडी अलगद वल्हवणारी ती… संध्याकाळी परसातील जाई,जुई अन् अबोल चाफ्याला आपल्या मोरपंखी स्पर्शाने फुलविणारी व अलगद सर्वत्र गंध सांडणारी…ती अंगणातील तुळशीला मायेचा स्पर्श करून आपल्या मंद झुळकेने सौख्य वाटणारी ती.. प्रत्येक गृहिणीस आपल्या पतीच्या प्रेमाची आठवण करून देणारी… व तिन्हीं सांजेला त्याच्या दीर्घायुष्याची कामना करण्यास भाग पाडणारी…ती अर्थात जिथे जाईल तिथे आपले अस्तित्व गाजवणारी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात (श्वास) म्हणून वसलेली …. सर्वांना हवीहवीशी असणारी ती हवा….
ही हवा सतत रंग बदलत असते. कधी आल्हाददायक सुखाचा गारवा देते… कधी प्रेमाची गुलाबी नशा चढविते …कधी शांत शितल वातावरणात नाचत बागडत अंगाभोवती घिरट्या घालुन जणू लाडाने कुरवाळते… तर कधी कधी रुसते…लपून बसते आणि मग मन कसं उदास वाण होतं वातावरण कोंदट होतं आणि मग येतो तो जुन्या आठवणींना पूर.. त्यात उसळतात भावनांच्या असंख्य लाटा… आणि मग त्या लाटेवर मन कसे हेलकावे घेतं… आणि मग अलगदच डोळ्यातून ओघळतात ते अश्रू… आणि मग अशा कातरवेळी तिला खरी गरज असते ती साथीदाराची….आणि तोच एक तिच्या हृदयाची तार छेडतो तो म्हणजेच तीचा पती(प्रियकर) वारा….अवखळ, खट्याळ, मस्तीत शीळ घालून मंजूळ पावा वाजविणारा अन् कधी कधी रौद्र रूप धारण करून मनमानी करणारा.
संसाररुपी सागरात ती कितीही संकटांना तोंड देत असते पण तिला खरी गरज असते ती एका खंबीर,भक्कम आणि प्रेमळ आधाराची…
पुनवेची रात असू दे किंवा रास खेळताना मग्न प्रियकर प्रेयसी असू दे….त्यांच्याही कळ्या तुझ्या मंद मंद लहरींने ….प्रणय गंधात नाहून निघतात ..अशा अनेक रंगांनी रंगलेली तू घराघरात प्रसन्नतेने दरवळणारी तू …. सर्वांना सुखाने न्हाऊ घालते… सतत हसत, खेळत, आनंदात राहून थकवा दूर करून नवचैतन्याची जणू तू पहाट…
संसाराच्या नौकेतही तू न डगमगता तोल सावरत सावरत आयुष्याची नाव हाकत असते… सर्वांच्या सुखदुःखाचा भार उचलून आपले जीवन गाणे गातच असते… आणि मग होतं तिलाही कधी तरी संसारात दुःख असह्य आणि तीही केव्हा केव्हा रागावते.. सैरभैर होते..परंतु तिचे रूपांतर मात्र छोट्याशा वावटळी मधेच होते …आणि सावरते ती लवकरच स्वतःला… आणि तिला नाही लागत त्याच्याप्रमाणे दुःख आवरण्यासाठी कोणत्याही व्यसनाची गरज… तिच्याकडे एकच रामबाण उपाय असतो तो म्हणजे नव्याने परिस्थितीशी झगडुन …. प्रेमाच्या भिंती बांधून आपलं घरटं उभारणे..
तो…तो तर आहेच मुळी रागीट, राकट, धसमुसळ्या स्वभावाचा पण त्याचा रुबाबही तसाच मोठा आहे… त्याचं धावणं खूपच वेगात असतं तो धावताना कधीच आपल्या सुखाची परवा करत नसतो…आणि परिणामाची ही चिंता कधीच करत नाही…कारण त्याचं मन उधाणलेलं असतं…कधी कधी आक्रमक होऊन तुफानही आणतो… तर कधी उध्वस्त करूनच शांत होतो…परंतु तो निर्दयी आहे असे म्हणता येणार नाही …वर वर जरी तापट असला तरी तो आतून फणसा सारखाच मधाळ आहे.. कधी आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी.. तर कधी कुटुंब च्या सुखासाठी त्याला कठोर बनावही लागते …तर कधी कधी करतो बेभान होऊन मनमानी…परंतु जेव्हा तो भानावर येतो तेव्हा मात्र सर्व सावरा सावर करतो ….त्याला त्यात मदत करते ती त्याची सहचरणी… आपल्या प्रेमाची शांत शितल फुंकर घालून ती त्याचे जीवन पुन्हा पूर्ववत करते… पुन्हा संसाराचा गाडा ओढत दोघेजण एकमेकांत एकरूप होऊन आपले जीवन जगत असतात…ती त्याला आपल्या प्रेमाने वेळोवेळी आवर घालून शांत,शितल गारवा देऊन संसारात प्रेम, काळजी, एकमेकांचे सुख दुःख समजून जगण्याची रीत सांगत…आलेल्या अडचणीवर शांततेने मात करण्यास सांगत असते…. अन् म्हणूनच त्याला ती भावते आणि तो तिच्या प्रेमात कायम..प्रेमात एकरूप होऊन जातो….

*सौ.आशा सचिन भावसार जालना.*

प्रतिक्रिया व्यक्त करा