*’देशात सध्या सांस्कृतिक आणीबाणी” – प्रा. रावसाहेब कसबे*
*चावडीवर मांडला वैचारिक जागर*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
देशात सध्या सांस्कृतिक आणीबाणी असून या आणीबाणीने साधुसंतांचे महत्त्व वाढवले. भांडवलशाहीचे हे खेळ असून दर वेळी भांडवलशाही वेगवेगळी रूपे बदलत समाजामध्ये वावरते, असे प्रतिपादन प्रा. रावसाहेब कसबे यांनी शनिवारी येथे केले. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने ‘चावडी’ ह्या एका नव्या सार्वजनिक मंचाच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते. या मंचाचे उद्घाटन लोकशाहीर कडुबाई खरात यांनी केलेल्या थाळीनादाने झाले दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये हा कार्यक्रम झाला. लोकशाहीर कडूबाई खरात यांच्या शाहिरी गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीची श्रृंखला आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधान अधोरेखित करत संविधान निर्मिती ही क्रांती होती, त्यानंतर २०१४ मध्ये प्रतिक्रांती झाल्याचे कसबे अध्यक्षीय भाषणात म्हणाले. मात्र प्रतिक्रांतीचा जन्म होतो तेव्हाच तिच्यात तिच्या विनाशाची बिजेही दडलेली असतात असे सांगत सातत्याने जागृती होत राहणे अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या देशाचे हिंदूराष्ट्र होणार नाही, मात्र त्यासाठी होणारे प्रयत्नही थांबणार नाहीत असेही ते म्हणाले.
उद्घाटन सत्राच्या व्याख्यानामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘असहमतीचा अधिकार आणि लोकशाही’ या विषयावर भाष्य केले. असहमती अधिकाराला जागा नाही त्याचे कारण आपली मौनसंस्कृती आणि दमनकारी सहनशीलता असे सांगत आजचे सरकार आणि शासनकर्ते नागरिकांच्या अधिकारांवर बंधने आणत आहेत, असे ते म्हणाले. युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांनी ‘समतावाजी समाजाचा युटोपिया’ या विषयावर आपले विचार मांडले. युटोपिया या शब्दाचे विवेचन करत त्यांनी आपल्याकडे होणारे ध्रुवीकरण उलगडले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार येणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावून त्यांचे विचार मांडता येऊ नयेत अशी तरतूद झाल्याचा आरोप या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केला. हा कार्यक्रम राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
चावडीच्या उत्तरार्धात ज्येष्ठ कवी, लेखक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पाणी कुठंवर आलं गं बाई’ हा दया पवारांच्या कवितांचा तसेच निमंत्रित कवींच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीरजा, अविनाश गायकवाड, गणेश कनाटे, छाया कोरेगावकर, दिशा पिंकी शेख, अक्षय शिंपी ह्या कवी-कवयित्रींनी कविता सादर करत वैचारिक जागर मांडला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार आणि कुटुंबियांसमवेत चावडीच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पद्मश्री दया पवार यांचे चाहते तसेच अनेक मान्यवरांसह रसिकांनी मोठी गर्दी केली होती.