आंतरशालेय मराठी नाट्यछटा स्पर्धेत आसावरी टोणपे प्रथम
इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील
कल्चरल एज्युकेशन सोसायटी व ललित कला महाविद्यालय आयोजित माध्यमिक आंतरशालेय मराठी नाट्यछटा (एकपात्री) स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कुलच्या कु. आसावरी नितीन टोणपे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर कु. ऐश्वर्या सुदर्शन शेळके (सरस्वती हायस्कुल), कु. हरिप्रिया नवलकिशोर झंवर (साई इंग्लिश स्कुल), कु. रिया बाबासो राजमाने (इचलकरंजी हायस्कुल राजवाडा) आणि कु. समृध्दी सचिन मुळीक (व्यंकटराव हायस्कूल) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला.
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन व नटराज पूजन व्यंकटराव हायस्कुलचे मुख्याध्यापक अशोक खोत यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांची ओळख संस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. कुलकर्णी यांनी करुन दिली. कला हे आत्म्याचे प्रकटीकरण असून कलेमध्ये समाधान व आनंद मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केली पाहिजे. विविध शालेय स्तरावरील स्पर्धांच्या माध्यमातून भविष्यात कलाकार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन श्री. कुलकर्णी म्हणाले.
या स्पर्धेत 35 स्पर्धक सहभागी झाले होते. पुढील वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्यवाचन स्पर्धा आयोजन करण्यात येईल. या महाविद्यालयामध्ये शालेय विद्याथ्यांसाठी चित्रकलेचे व अभिनयाचे सुट्टीच्या काळात शनिवार व रविवार मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा मनोदय आहे.
परीक्षक म्हणुन एस. एन. पसारे, आर. डी. गुरव यांनी काम पाहिले. स्पर्धेत कु. पूर्वी श्रावण चौगुले (आंतरभारती विद्यालय), कु. प्रज्ञा प्रक्षिण हानफोडे (विद्यानिकेतन हायस्कुल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन अमोल परीट यांनी केले. आभार आप्पासो वाघमारे यांनी मानले. याप्रसंगी नितीन सुतार, सोमनाथ जाधव, स्वप्निल मिठारी तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते.