*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच सदस्य लेखक कवी आबासाहेब घावटे लिखित नाटिका*
*अडाणी बायकू (नाटिका )*
ज्ञानबा :मी चोवाडीचा ज्ञानबा टकले. ही माझी बायको हौसा. नुसती कोल्हापूरची लवंगी मिरची हाय.
हौसा: हे आमचं धनी. गोगल गाय नी पोटात पाय. मोठ्या हापिसात असतात. सायबाच्या हाताखाली.. .
ज्ञानबा: हौसा,उरक बरं लवकर स्वयंपाक कर. मला बार्शीला जायचंय.
हौसा: अव धनी म्या काय तुमची खा भाकर अन् कर चाकरी करायची काय ?
ज्ञानबा: अगं मग म्हणती तरी काय ?
हौसा: मी बी येणार तुमच्यासंग .लोकांच्या बायका किती किती, कुठे कुठे फिरत्यात अन् मी आपली ……
ज्ञानबा: अग पण.
हौसा: पण नाही ना फिन नाही. मुकाट्यानं न्यायचं, नाहीतर उद्यापासून काम बंद.
ज्ञानबा: मोठी पंचायत झाली आता..ही येडी गबाळी कुठं न्यावी अन् कशी फिरवावी?:
हौसा: (अंगावर धावून जात )काय म्हणता?
ज्ञानबा: काही नाही बाई, म्हणी पाठ करीत होतो. चल बाई चल. हौसाची हौस पुरवावीच लागणार.( दोघ निघतात शहरात येतात)
हौसा: बया बया धनी हीत तर सारं बंगलच दिसत्यात. घ्या आपल्याला बी जागा कुठतरी अन् बांधा की एक बंगला. मी असलं येड गबाळ राहणं सोडून देईन अन् चांगली नटीसारखी राहीन .
ज्ञानबा: अगं आपण इथ राहून माझं म्हातार म्हातारी कोण सांभाळणार ?
हौसा: हे मातर खरं हाय धनी, सासू-सासरे हेच खरं ईश्वर हायीत.आजकालच्या पोरींना हेच कळत नाही. घेतला नवरा की निघाल्या उधळत..
ज्ञानबा: अगदी खरं बोललीस बघ.
हौसा: खरं हाय माझं .शिकलेल्या परस माझ्यासारखी आडाणी बरी. काय शिकल्यास शाळतनं ? नवरा मुठीत अन सासू-सासरे कुटीत वा रे वा !
ज्ञानबा: हे बघ आमच्या साहेबांचं घर आलं चल. हौसा: चला चला..(ज्ञानबा दारातून बेल वाजवतो.) मॅडम: कोण पाहिजे…?
ज्ञानबा: साहेब आहेत का?
मॅडम :ते बाहेर गेलेत( दार बंद)
हौसा: अव धनी त्या बाईंन काय घातलं व तसलं?
ज्ञानबा: अग तो गाऊन आहे.
हौसा: काय बया, चांगली दोन लेकराची आई हाय . तरीबी गवनच घालती. केसाचा बी कट हाणलाय..शोभत का तिला असलं?
ज्ञानबा: अगं शहरात असंच असतं.
हौसा :मला नाही बया असलं पटत.कायबी अन् कसबी . बाईंन कसं आपल्या रितीरिवाजापरमान राहावं.
ज्ञानबा: बरं तुला काय घ्यायचं?
हौसा: बायकाच दुसरं काय असतं. घ्या एक साडी…
ज्ञानबा: बरं चल (कपड्याच्या दुकानात जातात) दुकानदार: बोला बाई काय देउ ? राजा हिंदुस्तानी. का कुछ कुछ होता है..
हौसा: (दुकानदारावर भडकून) आर ए.. तुला काय अक्कल हाय का ? बाई माणसाला कसं बोलावं ते कळतय का तुला? चांगला म्हणतोय, कसं काय वाटतय तुला? अरं, हिंदुस्थानचे राजे शिवाजी महाराज.. बाई बघून असं बोलल्यावर जीव घेतला असता त्यांनी तुझा..
दुकानदार: (घाबरून) अहो बाई ती साड्यांची नाव आहेत.
हौसा: व्हय साड्यांची नाव .. लाव तुझ्या दुकानाला काडी..चांगलं म्हणतोय कसं काय वाटतय तुला?.. हे काय साडीचं नाव असतं व्हय रं? तुला वाटतं काय मीच लय शिकलोय? माझा नवरा बी सहा वर्ष दहावीत… अन चार वर्ष बारावीत अभ्यास करीत होता…. उगच नोकरी करीत नाही मोठ्या साहेबाच्या हापिसात.. चला नग आपल्याला ती साडी… चला .चला म्हणते ना?
ज्ञानबा :माझा ऐक जरा.
हौसा: काय आयकायचं नाही मला .त्यांन मला छापील दावायचं.. इरकल दावायची.. लई त्याचं दुकान भारी हाय तर पैठणी दावायची .का कसं काय वाटतय तुला?..वा र दुकानदार …
ज्ञानबा: चल बाई चल.
हौसा: काय बाई शिकलेली माणसं .बोलायचं कळना अन् व्यवहार काही जुळना ..
ज्ञानबा: मला एक गाडी बघू .
हौसा: बरं चला, मी बी आयटीत माग बसन …
दुकानदार: बोला साहेब ,कोणती पाहिजे बजाज होंडा की व्हेक्टर.
हौसा: दुकानदारावर भडकून.. अरे तुला काय हाय का नाही . माझा नवरा काय वकटा हाय व्हय अन तुझा बरा उजेड पडलाय… माझा नवरा काय बॅंडवाला वाटला काय तुला ? बाजा वाजवायला…. तो साहेब हाय साहेब… मोठ्या साहेबांच्या हाताखाली अन् हांडा घेऊन काय करू? तुझ्यात टकूर यावर घाल पालथा अन् बस वाजवीत.. काय बया ह्या माणसासनी बोलायच्या अकली न्हायत्या. काय बी अन् कसबी बोलत्यात. नग आपल्याला असली गाडी.. चला..चला म्हणते ना.. काय बया शहर अन बोलायचा कहर..
ज्ञानबा: चल बाई पाठकुळी वज अन कसं खाऊ भज?…
हौसा :धनी.. मला आता फिरून फिरून भूक लागली .तवा काहीतरी …..
ज्ञानबा: बरं ..चल जाऊ हाटेलात .
वेटर: काय हवय ? मच्छी फ्राय.. चिकन.. अंडा करी.. बैंगन मसाला का पालक पनीर.?
हौसा: अरे बाबा.. आमच्या पोटात आग पडली आग ..अन् फराळ फराळचं काय करतोस.. अंड्याची कडी तुझ्या कुणी केली होती?.. ताक लागत त्याला ताक.. बांगा मसाला नको की चिकणी नको …पुणेरी पालक दी . पुणेरी..
ज्ञानबा: दी बाबा लवकर काहीतरी उगीच हे ..
हौसा: गप जेवा आता…. अन् धरा गावाकडचा रस्ता..
ज्ञानबा: बरं बाई… अडाणी बायको अन् तिला सांगू का तिचं ऐकू..
हौसा: धनी, आपलं गाव कसं अन् इथं कसं? हाय का कुणाचा कुणाला मेळ. माणसाचं जीवन सुधारलंय पण माणूसपण हरवलय .. नगं बाबा आपल्याला शहरात.. आपलं खेड्यातच बरं. आपण तिथच चटणी भाकर खाऊ अन् सुखानं राहू…
आबासाहेब घावटे
८४९/२ उपळाई रोड ,
पवार प्लॉट बार्शी
मो .नं .9890829775