You are currently viewing लोकभिमुख कुलगुरू स्व.डॉ. दिलीप मालखेडे…………

लोकभिमुख कुलगुरू स्व.डॉ. दिलीप मालखेडे…………

*लोकभिमुख कुलगुरू स्व.डॉ. दिलीप मालखेडे…………..*

अमरावती

सुप्रसिद्ध आयएस अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्या कार्यक्रमासाठी अकोल्याला निघालो होतो .गाडी दर्यापूरच्या जवळपास असेल .तेवढ्यात सोशल मीडियावर डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दुःखद निधनाची बातमी कळली .खूपच वाईट वाटले. एक चांगला उपक्रमशील रचनात्मक आणि ताबडतोब निर्णय घेणारा बहुजन समाजाविषयी तळमळ असणारा आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असा मार्गक्रमण करणारा कुलगुरु आपल्यातून निघून गेलेला आहे .त्यांच्या आठवणी जेवढ्या सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असणारा माणूस माझ्याकडे येतो काय? मिशन आयएएसला पाठिंबा देतो काय? आणि मिशन आयएस संपूर्ण विद्यापीठात राबवण्यासाठी पुढाकार घेतो काय ?हे सर्वच नवलात टाकणारे आहे .मला आठवते मंगळवार दि. २ ऑगस्ट २०२२ ची गोष्ट .दुपारचे साडेबारा वाजले असतील. माझा मोबाईल वाजला .मी मोबाईलवर पाहिले .अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे साहेबांचा फोन होता.मी लगेच उचलला. साहेब मला म्हणाले मला सरदारधामच्या संस्थापकांशी बोलायचं आहे .त्यांनी जो स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम सुरू केलेला आहे .त्या संदर्भातील सर्व पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे. आपण त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सनी बोलू या .आमची चर्चा झाली आणि साहेबांनी मला तीन वाजता कुलगुरू कक्षात बोलावले. मी माझे अबुधाबी मधून आलेले विद्यार्थी प्रा. डॉ. चंद्रशेखर मुरादे यांना घेऊन कुलगुरू कक्षात पोहोचलो. कुलगुरूंचे पीए श्री रमेश जाधव यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला कुलगुरू कक्षात बसवले .बरोबर तीन वाजता कुलगुरू आले. आमची चर्चा सुरू झाली. स्पर्धा परीक्षाविषयक उपक्रम गुजरातमध्ये अहमदाबादला मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्याचे नाव आहे सरदारधाम. एकाच वेळेस दोन हजार मुलांना तिथे विनामूल्य स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते .तिथले संस्थापक श्री गज्जीभाई सुकरिया हे माझ्या परिचयाचे आहेत .मी त्यांना फोन लावला .दरम्यान कुलगुरूंनी स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम विद्यापीठात व विद्यापीठातील विविध महाविद्यालयात राबवावा अशी मला सूचना केली .नुसती सूचना करून ते थांबले नाहीत तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा केंद्र चालविणाऱ्या प्रा. डॉ. रंजना राऊत व जनसंपर्क अधिकारी श्री विलास नांदुरकर यांना त्यांनी लगेच बोलवून घेतले आणि त्यांना सूचना केली.काठोळे सरांची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सर्वप्रथम विद्यापीठात आयोजित करा व टप्प्याटप्प्याने आपल्या अधिकार क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यासाठी परिपत्रक तयार करा. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये हे प्रथमच घडत होते .स्वतः कुलगुरूंनी स्वतःहून फोन करणे .मला बोलावून घेणे व लगेच विद्यापीठात व इतर महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यासाठी रितसर पत्र काढणे ही खरोखरच अभूतपूर्व गोष्ट आहे. कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे हे अमरावती विद्यापीठामध्ये रुजू झाल्यापासून झालेले बदल मी पाहत आहे आणि विद्यापीठाला लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी जे पाऊल उचलले आहे ते खरोखरच अभिनंदन आहे. मी कुलगुरू डॉ. के जी देशमुख असताना त्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. विद्यापीठ तेव्हा बरेच लांब होते .गावाच्या बाहेर होते. विद्यापीठाच्या ऐवजी गाडगेनगर परिसरातील एखाद्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका हा उपक्रम सुरू करावा असे मी कुलगुरू के जी देशमुख यांना सुचविले होते .कारण गाडगे नगर राधानगर या परिसरामध्ये खूप विद्यार्थी राहतात .दाटी-वाटीने राहतात. घरात पुरेशी जागा नसते .भाड्याच्या खोलीत राहणा-या विद्यार्थ्यांची तर कुचंबना बघवत नाही. पण तो तेव्हा प्रकल्प कार्यरत झाला नाही. परंतु डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठाच्या परिसरामध्ये सात अभ्यासिका काढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटवून टाकला. कुलगुरू मला सांगत होते परवा मी अभ्यासिकेला भेट दिली .तेव्हा वडाळी परिसरातील एक मुलगी सकाळी आठ वाजता डबा घेऊन येते आणि रात्री आठ वाजता ती परत जाते .ती आमच्या विद्यापीठाची विद्यार्थिनी नाही .पण स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी अभ्यासिकेची दारे सताड उघडी करून दिलेली आहे .या बसा आणि अभ्यास करा .मला असं वाटते की अमरावती विद्यापीठाच्या इतिहासामध्ये हा उपक्रम पहिल्यांदा सुरू होतो आहे आणि एका दमात सात अभ्यासिका वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठाच्या परिसरात सुरू करून कुलगुरूंनी एक आगळे वेगळे पाऊल उचलले आहे .परवा एक सुखद बातमी परत ऐकायला मिळाली.अमरावतीच्या नांदगाव पेठ जवळील औद्योगिक क्षेत्रात रेमंडची फॅक्टरी आहे .त्या फॅक्टरीला स्वतः भेट देऊन कुलगुरुंनी कामकाज समजून घेतले. आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा काय लाभ होऊ शकतो या संदर्भात चर्चा केली .महाविद्यालय लोकाभिमुख व्हावीत त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला .जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेतले आणि या उपक्रमाची मूर्तमेढ रोवली. साधारणपणे कुलगुरूसारखी उच्चपदस्थ मंडळी जनमानसामध्ये फारशी मिसळत नाहीत .शासकीय दौरे. सभा .परदेशवाऱ्या हेच उपक्रम त्यांच्या कार्यकाळात सुरू असतात .परंतु त्याला फाटा देण्याचे काम जर केले असेल तर त्या कुलगुरूंचे नाव होते डॉ.दिलीप मालखेडे.
महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य विकासाचे धडे देखील दिले पाहिजेत .त्यांना जागे केले पाहिजे आणि सतर्क केले पाहिजे यासाठी त्यांनी उचललेले हे धाडसी पाऊल होते.स्वतः औद्योगिक विकास क्षेत्रातील संस्थांशी समन्वय साधून त्या संस्थांशी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कसा समन्वय साधता येईल .आपल्या औद्योगिक क्षेत्राचा विद्यापीठाला कसा लाभ होईल याचा अभ्यास करून ते स्वतः रेमंड फॅक्टरीमध्ये गेले .दुसरे कुलगुरू असते तर कदाचित त्यांनी रेमंडच्या मॅनेजरला आपल्या विद्यापीठाच्या केबिनमध्ये बोलावून घेतले असते. परंतु खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा यांचा संदेश अमलात आणून कुलगुरू स्वतःहून रेमंडमध्ये गेले. तिथले कामकाज समजून घेतले . आपले विद्यार्थी या कंपनीच्या माध्यमातून कसे घडतील यावरही त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या व रेमंडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राचार्य नेहमीच विद्यापीठात येतात. सभा होतात .काही निर्णय घेतले जातात. पण आपण या महाविद्यालयात पोहचलो पाहिजे. तिथल्या विद्यार्थ्यांना लोकाभिमुख केले पाहिजे.हा सूर मालखेडे साहेबांना पुरेपूर गवसला आहे आणि म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत व सतर्क करण्यासाठी जे सतर्कता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे तो खरोखरच अभिनंदनीय आहे. या सर्व उपक्रमांची सुरुवात जर या आधीच्या काळात झाली असती तर विद्यापीठाच्या स्थापनेला आज 40 वर्ष झालेली आहेत. या 40 वर्षातील आजचे श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे चित्र बरेच काही वेगळे असते.जेव्हा कुलगुरूंचा फोन आला तेव्हा कुलगुरू त्यांच्या मोबाईलवरून बोलत होते. साधारणपणे कुलगुरू पीएला सांगतात .पी ए फोन लावून देतो .परंतु साहेबांनी ती परंपरा तोडली .फेस टू फेस हा उपक्रम राबवला .मागे एक वेळ रविवारला मी त्यांना भेटायला गेलो होतो .मला एकट्याला भेटायला त्यांनी विद्यापीठातील आपले कार्यालय उघडले .चांगली तासभर चर्चा केली. खरं म्हणजे मालखेडेसाहेब ज्या परिस्थितीतून आलेले आहेत त्याची त्यांना जाणीव आहे. माझ्या विभागाचा विकास झाला पाहिजे .ही आंतरिक तळमळ त्यांच्या ठिकाणी आहे. कारण इथे येण्यापूर्वी ते ज्या पदावर आणि ज्या मोठ्या शहरात राहत होते त्या तुलनेत अमरावती म्हणजे एक खेडे आहे. एवढ्या मोठ्या पदावर आणि एवढ्या मोठ्या शहरात राहणारा माणूस तो बुरखा झुगारून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी आपल्या लोकांमध्ये येऊन त्यांच्यामध्ये मिसळून त्यांना सोबत घेऊन काम करतो ही फार मोठी गोष्ट आहे. जीतने वाले कोई अलग काम नही करते वह हर काम अलग ढंग से करते है. या ओळी त्यांना लागू पडतात .
श्री संत गाडगे महाराजांचे काम खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा संकल्प कुलगुरुंनी केलेला आहे .काल दुपारी साडेबारा ते रात्री साडेनऊपर्यंत आमचे सतत फोन एसएमएस सुरू होते आणि रात्री साडेनऊ वाजता जेव्हा अहमदाबाद वरून सरदारधामच्या संचालकांचा श्री गज्जीभाई सुकरिया यांचा मला फोन आला आणि त्यांचे मा. कुलगुरू साहेबांशी बोलणे झाले .आपण अहमदाबादला या.आपले स्वागत आहे .असे मला सांगितले तेव्हा हे दिवसभराचे विचार मंथन थांबले .रोजचे काम रोज केले पाहिजे या गोष्टीप्रमाणे कुलगुरू वागले. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे .स्पर्धा परीक्षेसाठी ताबडतोब पत्र काढण्यासाठी त्यांनी प्रा.डॉ.रंजना राऊत यांना सांगितले. ज्या सरदारधाम विषयी त्यांनी माझ्याकडून ऐकले होते त्या सरदारधामच्या संस्थापकांशी त्यांना बोलायचे होते आणि ते रात्री उशिरा का होइना.. त्यांनी माझ्यामार्फत का होईना.. तो योग जुळवून आणला आणि आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांची शिकवण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतलेला होता तो खरोखरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा होता.एक उच्चपदस्थ अधिकारी जेव्हा आपल्या खुर्ची मधून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्यासाठी जनमानसात येतो .तेव्हा त्याचा मोठेपणा हा दिसून येतो .ते व्रत माननीय कुलगुरूंनी स्वीकारले होते. आज त्यांच्यासारखा समाजाभिमुख माणूस आमच्यातून निघून गेला. ही खऱ्या अर्थाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांची फार मोठी हानी झालेली आहे. परंतु मालखडे साहेबांनी अल्प कालावधीमध्ये जे काम केलेले आहे ते काम विद्यापीठाला दिशा देणारे आहे. रहे ना रहे हम महका करेंगे या न्यायाने वानखडेसाहेब आज जरी आमच्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या रुपाने ते कायमचे आमच्या हृदयात राहणार आहेत. अशा या कर्तव्यदक्ष उपक्रमशील संवेदनशी माणसाला व हृदयापासून तळमळ असणाऱ्या देवदुताला आमची विनम्र आदरांजली
==============
*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे.* संचालक .मिशन आयएएस डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती कँम्प 9890967003.. प्रकाशनार्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा