*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने छबिलदासमध्ये कोमसापचा उपक्रम*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या वतीने जनरल एज्युकेशन सोसायटीचे (मुला-मुलींचे) छबिलदास हायस्कूल, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम छबिलदास हायस्कूलमधील भव्य हाॅलमध्ये दिमाखाने साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत छबिलदास शाळेतील पाचवी ते नववी या वर्गातील मुलांनी त्याचा आस्वाद घेतला. उपक्रमांतर्गत बाल कविता वाचन, कथा कथन, भाषिक खेळ आणि कोडी या सादरीकरणातून सर्वांना मनापासून आनंद मिळाला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ सभासद सतीश इनामदार, मुख्यध्यापिका श्रीमती शिनकर, सहशिक्षक श्री. गारळे आणि संस्थेचे सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दादर शाखेच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांनी कोकण मराठी साहित्य परिषद तसेच दादर शाखा यांचा परिचय उपस्थितांना करुन दिला. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन सहकार्याध्यक्ष अंजना कर्णिक यांनी केले. संस्थेचे सल्लागार उदय कर्णिक यांचीही या कार्यक्रमासाठी मोठी मदत झाली. कार्यक्रमात विद्या प्रभू, अंजना कर्णिक, समीर बने, निर्मला देऊसकर, सुरेश कापडोसकर, अशोक मोहीले यांनी बालकविता सादर केल्या. सूर्यकांत मालुसरे, मनोज धुरंधर यांनी दमदार आवाजात सुरेख चालींवर मराठी भाषा आणि महाराष्ट्र देशावर छान काव्य सादर केले. देवनार शाखेच्या पुष्पा कोल्हे, विलेपार्ले शाखेच्या सुमन नवलकर, वांद्रे पूर्व शाखेच्या जयश्री चौधरी, रंजना मंत्री, वांद्रे पूर्व शाखेच्या मधुमंजिरी गटणे यांनीही यावेळी सादरीकरण केले.