बांदा
मडुरा-बाबरवाडी येथील काजू बागायतदार शरद रेडकर यांच्या बागेला दुपारच्या सुमारास आग लागून 40 काजू कलमे जळाली. यात बागायतदार रेडकर यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बाबरवाडी येथील काजू बागायतीत दुपारच्या सुमारास अचानक धूर दिसू लागला. जवळपास काम करत असलेले नितीन धुरी, अभिमन्यू धुरी यांनी तात्काळ बागेजवळ धाव घेतली व आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. काही प्रमाणात गवत असल्यामुळे आग विझविताना कसरत करावी लागली. आगीची खबर समजताच मालक शरद रेडकर, शामल रेडकर, गुरु रेडकर, सखाराम रेडकर यांनीही धाव घेतली. वेळेत आग विझविल्याने लागूनच असलेल्या सुमारे 50 एकरवरील बागायती वाचल्या. सहा वर्षाची मेहनत आज लागलेल्या आगीत खाक झाली असे सांगत शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणले. यावेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागून आपले नुकसान झाल्याचे बागायतदार रेडकर यांनी सांगितले. मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनीही भेट घेत वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, बांदा सहाय्यक कनिष्ठ अभियंता अनिल यादव व वायरमन सपकाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येत पाहणी केली. तसेच भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. यादव यांनी सांगितले.