You are currently viewing बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

*सर्वांगीण विकासासाठी जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे”: किशोर सोन्सुरकर*.

कुडाळ :

“विद्यार्थी दशेमध्ये मिळणारे यश हे चिरकाल टिकते, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालखंडात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, खेळांमध्ये भाग घ्यावा, सहभागी व्हावे कारण हे सर्व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे”, असे उद्गार दाभोली हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री. किशोर सोनसुरकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास व्यासपीठावरून बोलत होते. “कुठलाही अभ्यासक्रम हा सोपा नसतो, त्यामध्ये शरीर व मन एकत्र करून एकाग्रपणाने अभ्यास करावा लागतो तरच यश संपादित होते. अभ्यासासोबतच मैदानी खेळ हे सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत” असेही ते पुढे म्हणाले.

श्री.किशोर सोन्सुरकर यांना 2017 मध्ये मिस्टर एशिया मास्टर कॅटेगरी मध्ये मानाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ते रस्सीखेच, शरीर सौष्ठत्व इत्यादी स्पर्धांचे जागतिक पातळीचे खेळाडू आहेत, त्यांनी यासाठी अनेकवेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. उमेश गाळवणकर. बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ. मीना जोशी, बॅ.नाथ पै महिला व रात्र कॉलेज प्राचार्य श्री. अरुण मर्गज, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला उपस्थित होते.

दीपप्रज्ज्वलन करून शुभारंभ झालेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना नर्सिंग प्रा. सौ. सुमन सावंत यांनी केली. नर्सिंग प्राचार्य सौ. मीना जोशी आणि बॅ. नाथ पै महिला/रात्र कॉलेजचे प्राचार्य श्री .अरुण मर्गज यांनीही विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“तणावमुक्त आयुष्य हे आजच्या जगातील सर्व माणसांची मूलभूत गरज बनली आहे. आनंदी रहा, स्वच्छंद आयुष्य जगा तरच शरीराने आणि मनाने तुम्ही सुदृढ राहाल .”असे उद्गार संस्था अध्यक्ष माननीय श्री. उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढले. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा हा विविधरंगी कला छटांनी भरलेला होता.

20 जानेवारीच्या सायंकाळी पु .ल .देशपांडे रंगमंचावर ‘इंद्रधनु’ हा स्नेहसंमेलनाचा (गॅदरिंग) विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि स्त्री प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर जी. एस. कुलकर्णी अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळचे सुपुत्र ज्येष्ठ रंगकर्मी श्री. केदार देसाई लाभले. यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना इंद्रधनु या त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. या सर्व बहुरंगी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नर्सिंग प्रा.वैजयंती नर, नेहा महाले, कृतिका यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रुगवेदा राऊळ यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व विभागाचे प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा