You are currently viewing आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी आंगणेवाडी विकास मंडळ सज्ज

आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी आंगणेवाडी विकास मंडळ सज्ज

*जत्रोत्सवात यावर्षी गर्दीचा उच्चांक*

 

आंगणेवाडीची भराडी देवी म्हणजे नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे. आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भराडी देवीला नवस बोलण्यासाठी, फेडण्यासाठी भक्त येत असतात. त्यामुळे आंगणेवाडीचा जत्रोत्सव म्हणजे एक अभूतपूर्व सोहळाच होतो. यावर्षी आंगणे वाडीच्या जत्रोत्सवमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला जाईल अशी शक्यता असल्याने आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई सज्ज झाले असून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.

*दरवर्षी पेक्षाही यावर्षी गर्दीचा उच्चांक गाठला जाईल अशी शक्यता असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनाची वेळ वाढविण्याचा निर्णय आंगणेवाडी विकास मंडळ घेणार आहे. त्याचप्रमाणे तीनही पार्किंगच्या जागांमध्ये अपंगांसाठी रिक्षांची व्यवस्था मंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे अपंगाना देखील सुलभ दर्शन मिळणार आहे.* एकंदरीत राज्यभरातून लोटणारा गर्दीचा महापूर पाहता आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई, ग्रामस्थ आणि प्रशासनाने कंबर कसली आहे.

मागील वर्षी आंगणेवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती. यावर्षी बदललेल्या मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर सर्व रस्ते वाहतुकीला योग्य बनविण्यात आले आहेत. रस्त्याचे काम देखील दर्जेदार झाले आहे त्यामुळे आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी *संवाद मीडियाने* रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. आंगणेवाडीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोंनत्ती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून सुस्थितीत करण्याच्या कामासाठी १०.६० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे आंगणेवाडी व परिसरातील नागरी सुविधा आणि विकास कामांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कायापालट होणार आहे.

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक सार्वजनिक आणि व्यक्तिगत वाहने घेऊन दाखल होत असतात. रस्त्यांचा दर्जा सुधारल्याने भक्तांना आंगणेवाडीला दर्शनास येणे सुलभ होणार असल्याने भक्तांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पहावयास भेटेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा