मातोंड सोसायटीच्या कार्यक्रमात चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार…
वेंगुर्ला
वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी सहकारा सोबत राजकारणात सुद्धा निस्वार्थीपणे काम करणारे ज्ञानेश्वर केळजी विराजमान झाले याचे समाधान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने कशाप्रकारे जनतेसाठी काम करावे हे केळजी यांच्याकडून शिकावे. वेंगुर्ला खरेदी विक्री संघ पुन्हा एकदा अव्वल करण्यासाठी जे काय पाठबळ द्यायचे ते केळजींना आम्ही सर्व संचालक देऊ असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मातोंड येथे बोलताना केले.
वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी मातोंड सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी यांची निवड झाल्याबद्दल मातोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विविध संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी बोलत होते.
त्यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, मातोंड येथील जेष्ठ मार्गदर्शक हिरोजी उर्फ दादा परब, रमाकांत परब, उदय परब, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभू, सरपंच जानवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, पं स माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, वजराठ सोसायटी चेअरमन वसंत पेडणेकर, तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, अण्णा वजराटकर, तुळस माजी सरपंच शंकर घारे, विजय रेडकर यांच्यासाहित सोसायटी संचालक, खरेदी विक्री संघ संचालक, विविध संस्था, मंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले की, जिल्हा बँक मार्फत फक्त १ वर्षात दूध संकलन १३ हजार लिटर वरून ३० हजार लिटर पर्यंत गेले आहे. पुढचा वर्षी ते ५० ते ६० हजार लिटर वर जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या काळात आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने शेती हे क्षेत्र त्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी आतापासून केली पाहिजे, यासाठी लागणारी ताकद विकास संस्था , संघ व बँकेच्या माध्यमातून देऊ सर्व संत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्र यावे. नवीन पिढीला स्थिर करण्यासाठी शेती शिवाय पर्याय नाही. शेतीला तंत्रज्ञान व अभ्यासाची जोड दिली तर या जिल्ह्यात शेती क्षेत्राला चांगले नक्कीच येतील असे श्री दळवी म्हणाले.
मनिष दळवी यांच्या काळात खरेदी विक्री संघ हा सक्षम होता. केळजी यांच्या रूपाने पुन्हा एकदा सक्षम नेतृत्व संघाला मिळाले आहे. सर्व विकास संस्थांची शिखर संस्था ही खरेदी विक्री संघ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संघ हा भरभराटीला जाईल असे यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले. प्रशासनातील निवृत्त झालेले हे व्यक्तिमत्व आपल्या बुद्धिमत्तेचा संघासाठी वापर करून संघाला एक नवीन भरारी केळजी देतील असे सांगत डॉ प्रसाद देवधर यांनी शेतकरी व उपस्थिताना शेती या विषयावर मार्गदर्शन केले.