*कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे सदस्य लेखक कवी श्री.विजय अर्जुन सावंत यांच्या “जगण्याचे आर्त” काव्यसंग्रहाचे कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी केलेले रसग्रहण*
*जगण्याचे आर्त*
“जगण्याचे आर्त” कवी विजय अर्जुन सावंत, सायन, मुंबई यांचा हा प्रकाशित दुसरा काव्यसंग्रह…! कणकवली येथील प्रभा प्रकाशन यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून ख्यातनाम छायाचित्रकार श्री.संदेश भंडारे यांचे बोलके मुखपृष्ठ *”जगण्याच्या आर्त”* या कवितासंग्रहाबद्दल मुखपृष्ठच चित्रातून अंतरंग खोलून जातं…!
कवी विजय सावंत यांच्या “जगण्याचे आर्त” काव्यसंग्रहाला प्रा.डॉ.गोविंद काजरेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. डॉ.काजरेकर आपल्या प्रस्तावनेतच म्हणतात की, सामाजिक विसंवादाच्या अनुभवातून आलेली अस्वस्थता हे या काव्यसंग्रहातील कवितांचे प्रमुख आशयांग आहे. कवितेच्या शीर्षकातच या कवितेचा स्वर दडलेला आहे. आर्तता ही कोणत्याही काळातील साहित्याचा आत्मा असते. आजही माणूस माणसाची शिकार करतो आहे, त्यासाठी जात, धर्म, लिंगभेद, सत्ता अशी अनेक शस्त्रे परजली जात आहेत. कवी या कृतीचा निषेध करीत शब्दांचे शस्त्र उगारून प्रतिकाराची भूमिका घेत आहे.
कवी अजय कांडर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना, इथे जात, धर्माच्या नावाखाली अराजक माजले यावर *”जगण्याचे आर्त”* मधील कविता नेमका घाव घालताना त्याच्या समकालीन गुंत्याकडे लक्ष वेधून आजचा काळ आपल्यावर किती भयानकपणे चाल करून येत आहे याकडे बोट दाखवते असे नमूद केले आहे.
आजूबाजूची सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक उलथापालथ माणसाला मुळातून उलथून टाकते की काय अशी सततची भीती वाटत राहिल्यामुळे माणूस समकाळात आतून पुरा हादरून गेला. समाज, कुटुंब व्यवस्था, व्यक्तिव्यक्तीतील बदललेले नाते संदर्भ सुखापेक्षा जास्त दुःख देऊ लागले. त्यामुळे अस्वस्थपणाला मोकळी वाट करून देण्याचा एकच मार्ग कवीला सापडला तो म्हणजे ‘ कविता ‘ अर्थात हेच कवीच्या जगण्याचे आर्त…! असे कवीने आपल्या मनोगतातून सांगितले आहे.
*देवच माणसांमाणसांत भांडणे लावतात…*
*आपण भांडतो कशावरून?*
*चर्च, मंदिर, मशीद, गीता, रामायण, बायबल, कुराणावरूनच ना..?*
असे जीवनातील वास्तव कवी आपल्या “शहाणपण” कवितेतून मांडतो आहे. का? तर ते शहाणपण आपल्यात पाझरावं यास्तव…!
“शांततेची नष्टता” या कवितेतून कवीने समाजात, देशात अराजक माजवणाऱ्या…मनुस्मृतीचे संवर्धन अन् संविधानाचे कोथळे काढून सत्याच्या लेखणीचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंडच पुकारले आहे.
*”ती ..”* सारख्या कवितेतून कवीने स्त्री घरात असताना पत्नी, सून, मुलगी, ताई, आई अशा अनेक नात्यात गुरफटलेली असते परंतु घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडताच अपरिचित नजरांसाठी फक्त ती मादी होते…
*”दरवाजाची चौकट तिची जागा ठरवते…”*
असे सांगत कवी समाजातील आसुसलेल्या नजरा आणि समाज मनावर आसूड ओढतो आहे.
*तू माती हो, दगड हो*
*वीट हो, चिरा हो*
*गाळ हो, धूळ हो*
*राख हो, मळ हो*
*पण मंदिराचं पाषाण नको होऊस*
*कुणाच्या श्रद्धेची नको खेळूस….*
*तू फक्त माणूस हो…*
अशी भावनिक साद घालत कवीने देवाला तू पाषाण होऊ नकोस तर माणूस हो अशी विनवणी केली आहे.
*”ते काहीही करतील…”*
या काव्यातून कवीने आजच्या राजकीय व्यवस्थेच्या कानशिलात मारताना ज्वलंत शब्दांमध्ये परखडपणे भाष्य केलं आहे…
*”ते बदलू शकतात अगदी भूगोलसुद्धा*
*ते झोपड्या पाडतील*
*विमानतळ बांधतील*
*प्राथमिक शाळा बंद करून*
*महाविद्यालये उघडतील*
*मंदिरालाच प्राधान्य देतील*
*तुमचा मेंदूही आपल्या ताब्यात घेतील*
आता आपण आपल्या मेंदूचा सातबारा तपासून बघायला हवा ..आपल्या नावावर तर केला नाही ना…?
असा खोचक प्रश्न विचारून लोकशाही कडून ठोकशहीकडे चाललेल्या व्यवस्थेची पाळेमुळे खोदून उघडी पाडली आहेत.
“टाळेबंदीत भरदुपारी” मधून कवीने देव म्हणजे कोण? देव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माणुसकी जपणारी माणूसच…! हे अगदी सहज सोप्या भाषेत सांगितलं आहे…
*”जगण्याचे आर्त”* या काव्यात…
*मिरगाच्या तोंडावर खुरपणी*
*नांगरणी करून रोपं लावली*
*खतपाणी घातले… तरी नात्यांचं*
*रोप तरारून वर आलंच नाही…*
अशी खंत व्यक्त करताना *”माती एवढी नापीक कशी निघाली..?”* असा प्रश्न उपस्थित करून भाऊबंदकी, नात्या नात्यात आलेला दुरावा निसर्गाच्या लहरीपणाला संबोधून स्पष्ट केला आहे…
“आई म्हणायची” या कवितेतून कवीने…
*घराला गोठा*
*गोठ्यात गाई गुरं*
*राखणदारी कुत्रा*
*पायात घुटमळणारे मांजर*
*अंगणात तुळशी वृंदावन*
*परसदारी काकडी, लालमाट*
*वेलीवर कळ्या फुल खेळायला हवीत*
*दारात शेण सडा रांगोळी*
*पाहुण्यांचे येणं जाणं…*
*चपलांचा ढीग वाढायला हवा*
*लोट्यावर म्हातारा खोकायला हवा*
*डोळ्यात भक्ती आणि मुखात पांडुरंग हवा*
*माणूस माणसाला भेटायला हवा…*
अशा सर्वसामान्य माणसांच्या घराचे वास्तव दर्शन करून देताना, आजकाल घरातील वयोवृद्ध माणसांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तिथे कवी म्हणतो, लोट्यावर म्हातारा खोकायला हवा…म्हणजे समाजातील विकृती सुद्धा कवीने शालजोडीतले हाणून गोडबोल्या शब्दांतून मांडली आहे.
*इथे दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार केली जाते*
*सुवासिनींची उपेक्षा भडव्यांची ओटी भरली जाते*
“आहे हे असं आहे” या कवितेतून कवीने देशात सुरू असलेल्या सत्य परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केलं आहे… दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याची वृत्ती वाढली असून “तो मी नव्हेच” या भूमिकेत सत्तेचे पुजारी वागतात…जो खरा हक्कदार असतो त्याला डावलून चोरांना, भडव्यांना साव म्हणून समोर आणले जाते..
“भुताचे झाड” मधून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे विदिर्ण वास्तव कवीने आपल्या कवितेतून मांडले आहे.
ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, टोळधाड, अवकाळी पाऊस….
कोणावर तरी तुमच्या आत्महत्येचा खरा खोटा ठपका ठेवता आला असता…
असे म्हणत कवी शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या आणि त्याची खरी कारणे शोधण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
*”तुमच्या एका घोषणेने थांबले माणसांचे माणसांकडून माणसांसाठी माणुसकीचे होणारे मंथन”…*
“एका घोषणेने” या कवितेतून कवीने कोरोना काळात लॉकडाऊनच्या एका घोषणेने देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वाडी वाडीतील थांबलेले रस्ते, फुटलेल्या पाट्या, तुटलेली नाती आणि विझलेल्या वाती, कामगारांचे पोटाकडे नेणारे बंद पडलेले रस्ते, कापलेले तोंडाकडे जाणारे शेतकऱ्यांचे हात, आया बहिणींचे भर रस्त्यात झालेले हाल, अन् लोकांच्या तोंडचा पळालेला घास आदींच्या वेदना अगदी यथार्थ मांडलेल्या आहेत.
“तो मंदिरात नाही
कधीच बाहेर पडलाय
भक्तांच्या पुजाऱ्यांच्या नकळत
नजरकैदेतून निसटलाय.”
देव मंदिरातून कधीच बाहेर पडला आहे, वृथा रांगा लावू नका…नाहीतरी तुम्ही त्याला कोंडूनच ठेवला होता तुमच्या कडी कुलपात… देव नांगरणी करतो अन् तुम्ही पोटभर जेवता…तुम्ही उद्घाटन करून निघून जाता आणि देव पूल बांधतो… म्हणजे कवीने देव कडी कुलपात राहण्यास कंटाळला आहे असे सांगताना देवाचं अस्तित्व सुद्धा अधोरेखित केलं आहे.
*देवा बरे झाले असते*
*बाईच्या पोटी गर्भ नसता*
*गर्भाला नारळ नसती*
*स्तन नसते…पोट नसते..भूक नसते*
*पोटाखाली सगळा अंधार असता…*
*सगळेच प्रश्न मिटले असते…!*
आजच्या लोकशाहीत खरे खरे चित्र कवीने आपल्या लोकशाही झुले रे या कवितेतून समाजापुढे उभे केले आहे “भले रे देवा, भले रे
शिखंडीच्या मांडीवर लोकशाही झुले रे…
लोकशाही झुले रे…!”
अशा शब्दात कवीने सध्याच्या लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत…
*”तुझी ओल अन्*
*माझी जगण्याची आस*
*एक होऊ दे..!*
*हे दयाघना*
*प्रत्येक माणसाच्या मनामनात*
*प्रेम, करुणा, माया, ममतेची बी रुजू दे”.*
आता राम राम नको, किमान एक तरी खूण पटू दे, शोध, पानगळ, हुंदका, झाड आणि माणूस, हा भवताल, चिरकाल समाधानासाठी अशा अनेक कवितांमधून कवीने माणसाने सामान्य पण हरवून स्वतःतील संवेदनाच गमावून बसला आहे. त्यामुळे त्याची रक्ताची नाती दुरावली ही खंत कवीच्या मनाला सलताना दिसते आहे. म्हणून कवी परमेश्वराकडे माणसाच्या मनात प्रेम, माया, ममता, करुणा सदैव अबाधित राहू दे, अशी प्रार्थना करतो आहे.
संपूर्ण कवितासंग्रह वाचला असता विजय सावंत यांच्या कवितांचा प्रवास हा सामाजिक जाणिवांकडे होताना दिसतो आहे. माणसांच्या मनातील खोलवर दडलेल्या व्यथांना वाचकांच्या नजरेसमोर आणून कवी विजय सावंत आपल्या शब्दांतून प्रत्येक क्षण, घटना, जगायला लावत आहेत. आपल्या प्रगल्भ शब्दरचनेमुळे कवी वाचकांना आपल्या कवितेमध्ये खोलवर डोकावण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आजच्या बदललेल्या देशपातळीवरील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कवी विचलित न होता सत्य परिस्थिती आपल्या काव्यातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असून उगाचच वाहवा करणाऱ्या लोकांना सत्याची जाणीव करून देत आहे.
मुक्तछंद काव्यप्रकार मध्ये लिहिलेल्या कवितांमधून कवीने मुक्तपणे शब्दांच्या कुंचल्यातून माणसांच्या सामाजिक, सार्वजनिक जीवनातील, देश पातळीवरील विषय, राजकीय घडामोडी, नातेसंबंध, आपला गाव, देव आणि माणूस, निसर्ग, शेतकरी आत्महत्या आदी विषयांमधून वाचकांच्या हृदयाला हात घातला आहे. सध्याच्या सत्ताधारी लोकांकडून देशात होत असलेले बदल पाहता गोरगरीब लोकांची किव देखील त्यांना येत नाही तर स्वार्थासाठी ते देशाचा भूगोल सुद्धा बदलून झोपड्या पाडून विकासाच्या नावाखाली लोकांना बेघर करून विमानतळ सुद्धा बांधतील, प्राथमिक शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, त्या बंद करून धनधांगड्या लोकांसाठी महाविद्यालये उभारतील, मंदिरे बांधतील आणि अगदी जनतेचा मेंदू सुद्धा सातबारा आपल्या नावावर करून ताब्यात घेतील असे कवी म्हणतो ते खरे वाटत असून आज देशात सुरू असलेली दंडूकेशाही, दादागिरी, बोलणाऱ्यांचा आवाज दाबून टाकणे, विरोध करणाऱ्याला देशद्रोही ठरविणे आदी घडतं असलेल्या प्रकरणावरून कवीच्या मताला पुष्टी मिळत आहे. देशाच्या लोकशाहीला बाधा आणणाऱ्या अत्यंत ज्वलंत विषयांवर काव्यातून आसूड ओढत देशात सुरू असलेली राजकीय स्थिती आणि त्याचे सर्वसामान्य जनतेवर होत असलेले परिणाम प्रखरपणे दाखवून दिले आहेत. “मुंह में राम और बगल में छुरी” अशीच आजच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती असल्याचे कवी विजय सावंत यांच्या अनेक कविता वाचताना निदर्शनास येते.
आज देशात होत असलेले धर्माधर्मातील वादविवाद हे देव, गीता, पुराण, कुराण अशाच गोष्टींवरून होत आहेत. म्हणजे आपण देव मानतो परंतु त्या देवासाठीच भांडतो… यावरून “देवच भांडणे लावतो” असा कवीने केलेला युक्तीवाद नक्कीच पटतो. स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा गल्ली पासून दिल्ली पर्यंत सुरू असतात, परंतु जेव्हा स्वतंत्रपणे एखादी स्त्री उंबरा ओलांडून बाहेर पडते तेव्हा वकवकलेल्या अनेक नजरा तिच्या देहावर खिळतात. एकीकडे कन्यादिन, महिलादिन असे देखावे उभे केले जातात आणि त्याच कन्या, महिलांवर वाईट नजरा रोखल्या जातात हा विरोधाभास कवीच्या मनाला पटत नसल्याने कवीने आपल्या काव्यातून ओढलेले ताशेरे नक्कीच वाचकांना विचार करायला लावतात. आज म्हातारी, वडीलधारी माणसे सुधारित पिढीला नकोशी झाली असतानाच आई म्हणायची की, घरात गोठा, गाईगुरे, कुत्रा, मांजर, घरासमोर तुळस, परसात भाज्या, दारात शेण सडा, रांगोळी आणि मुख्य म्हणजे लोट्यावर खोकणारा म्हातारा आधाराला हवा असे कवी आपल्या आईच्या आठवणींमधून सांगतो. यावरून खरोखर घरावर चांगले संस्कार हवेत तर वडीलधारी माणसे घरात हवीत. राखण करायला कुत्रा आणि घरात येणारे सरपटणारे प्राणी कीटक यांच्यापासून बचावासाठी मांजर हवे… भाकरी बरोबर तोंडी लावायला परसात लगेच उपलब्ध होणारी भाजी हवी, घरात सौख्य नांदते याचा पुरावा म्हणजे दारातील अंगणात होणारा शेणसडा… आणि दारासमोर रांगोळी हवीच हे कवीने केलेले युक्तीवाद नक्कीच पटण्यासारखे…! कारण सारवलेल्या शेणाच्या जमिनीवर रांगोळी रेखाटली की अंगणाला शोभा येते, वातावरण प्रसन्न भक्तिमय राहणे…!
एका व्यक्तीच्या घोषणेने आणि चुकीमुळे देश कित्येक वर्षे मागे गेला, विकास रखडला, लोक अर्धपोटी राहून जगले, शाळेतील मुलांचे नुकसान झाले, शेतकरी हवालदिल झाले, लोकांच्या तोंडचे घास पळाले, कित्येक जण मृत्यूला कवटाळून परलोकी गेले… हे कवीने कोरोना काळातील परिस्थितीवर केलेले भाष्य खरोखर मनाला चटका लावून जाते. देवाला रांगा लावून उगाच मंदिरात शोधू नका, तर देव माणसात, चराचरात, सर्वत्र आहे, तो कडी कुलपात राहत नाही. हे म्हणणं मनापासून पटतं. पुजारी, भक्त देवाला कुलपात बंद करतात, देव्हाऱ्यात बंद करून ठेवतात हे पटत नाही, तर देवाला आपण बांधून अडवून तो राहणार नाही तर शेतकरी नागरताना देव नांगर धरतो, तेव्हा आपण पोटभर जेवतो हा तर्क खरोखरच मनाला पटला. कवीने काव्यातून मांडलेले विचार तंतोतंत पटण्यासारखे आहेत यात वादच नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा, अनेक घटनांचा संबंध आपल्या व्यक्तिगत जीवनाशी सुद्धा निगडित आहे याचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही…
कवी विजय सावंत यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा…असेच समाज मनाच्या डोळ्यावर आलेले धुक्याचे ढग दूर होण्यासारखे ज्वलंत लेखन आपल्या हातून घडून साहित्य सेवा होऊ दे…!
कवितासंग्रह
*जगण्याचे आर्त*
कवी: विजय सावंत
📞९९७८१७५३९०
प्रकाशक…
प्रभा प्रकाशन, कणकवली
मूल्य रु. १७५/-
✒️रसग्रहण..:
[दीपी]
दीपक परशुराम पटेकर
सावंतवाडी
८४४६७४३१९६