ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –
जिजामाता ह्या भारत वर्षात एक प्रेरणादायी मातेचे रूप आहेत. एक योद्धया, एक शाशक, महिलांची रक्षक, १२ जानेवारीला त्यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी झाली. त्याचबरोबर ३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी झाली. ह्या दोन महान महिलांचा कुठेतरी मोठा संबंध आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये महिलांना कनिष्ठ स्थान देण्यात आले आहे. महिलांनी शिकायचे नाही, कुठे काम करायचे नाही फक्त चूल आणि मूल सांभाळायची. पदर खाली ढळता नये. परपुरुषासमोर जायचं नाही. आता सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागात स्त्रिया समोर येऊन पाहुण्यांशी बोलत नाहीत. स्त्रियांचा घराबाहेर जाण्याचा विषय हा टीकेचा विषय होता. आज आपण तालिबानला शिव्या देतो. पण जसे तालिबान वागतात तशीच जगामध्ये स्त्रियांची परिस्थिती होती व आज देखिल आहे. शाळेत, वर्गात बसताना मुल व मुली वेगळेच बसतात. सत्य शोधाकांच्या सभेत सुद्धा स्त्री-पुरुष वेगळेच बसतात. अर्थात हा काही फार मोठा विषय नाही. पण तो समाजाची मानसिकता दर्शवितो. अनेक सभेमध्ये पुरुष खुर्च्यांवर बसतात व स्त्रिया जमिनीवर बसतात. अशा प्रकारे समाजात अत्यंत छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी पर्यंत स्त्री-पुरुष विषमता अनेक जागी दिसून येते.
शिवरायांनी जिजामातेच्या प्रेरणेने रयतेचे राज्य निर्माण केले. त्यावेळच्या समाजामध्ये स्त्रियांवर प्रचंड अन्याय होत होता. स्त्री ही लढाईतील लूट समजली जात होती आणि म्हणून स्त्रियांचे शोषण हे धर्म मार्तंड करायचे. राजे राजवाडे करायचे आणि शत्रू तर करायचाच. महाराष्ट्रात त्यावेळेला पाटील, देशमुख, देशपांडे यांचे राज्य होते. कुठलीही स्त्री उचलायला जमीनदार आणि वतनदार मागेपुढे पाहत नसत. तसेच रांज्याच्या पाटलाने अबला स्त्रीवर बलात्कार केला. त्यावेळी शिवरायांचा स्तर एका वतनदाराचा होता. शिवरायांच्या कानी जेव्हा ही घटना पडली, त्यावेळी जिजाऊंनी आदेश दिला ‘पाटलाला मुसक्या बांधून आणा.’ त्यावेळेस सर्वच जमीनदारांना वाटलं की, एक सोळा वर्षाचा जागीरदार एका वतनदाराला कैद करतो आणि फक्त बलात्कार केला म्हणून, मुसक्या आवळून आपल्याकडे नेतो. यावेळी राजांच्या पाटलाचं कृत्य हे कुणाला आश्चर्यकारक वाटलं नव्हतं. जणू काय त्या पाटलाचा तो अधिकारच होता. जिजाऊंनी आदेश दिला की ‘पाटलाला कडक शिक्षा द्या.’ शिवरायांनी त्याचा चौरंग केला. अशा काही काही घटना असतात त्याचे दूरगामी परिणाम होतात. तसाच या घटनेचा परिणाम झाला. महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जनता हर्षित झाली. हा राजा आपल्या स्त्रियांचा संरक्षण करत आहे. प्रत्येक पित्याला वाटलं की आपली मुलगी सुरक्षित आहे. प्रत्येक नवऱ्याला वाटलं की आपली पत्नी सुरक्षित आहे. पुढे जाऊन कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी प्रसिद्ध आहे. त्या काळात स्त्री हा लुटीचा भाग होता. म्हणून युद्धामध्ये सुंदर स्त्रियांना पकडल्यावर तो राजे राजवाड्यांना नजरांना म्हणून पेश केला जायचा. त्याच भावनेने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांना नजराना म्हणून पेश करण्यात आले. पण महाराज उद्दगारले ‘अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो.’ एका शत्रूच्या सुंदर स्त्रीला आईची उपमा देऊन महाराज्यांनी तिला पवित्र केले. साडी चोळी देऊन तिला सन्मानाने सासरी पाठविले. शिवरायांचा लोकप्रियतेचे एक सूत्र हे त्यांचे स्त्रिया विषयीचे धोरण. अशा अनेक घटना त्यांच्या राज्यात घडल्या आणि शिवरायांनी नेहमी स्त्रियांचे संरक्षण केले. शत्रूच्या स्त्रियांचे संरक्षण केलं. म्हणून ते प्रचंड लोकप्रिय झाले. जगात असला कुठलाही राजा झाला नाही ज्याने शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान केला.
रयतेसाठी त्यांनी असे अनेक धोरण लागू केली. शेतकऱ्यांच्या विषयीचे धोरण, सर्वधर्म समभाव, जातीचा अंत म्हणून रयत शिवरायांच्या बाजूंनी ठाम राहिली. शिवरायांसाठी प्राण देण्यासाठी नेहमी तत्पर राहिली. रयत स्वराज्यावर अफाट प्रेम करू लागली. स्वराज्य टिकावे म्हणून रयतेने सर्वस्व प्रणाला लावले. हे जरी खर असले तरी स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त त्रास होतो. हे काही नाकारता येत नाही. हा आदर्श घेऊनच मी जीवनात वावरलो आहे. लोकसभेतील पहिल्या भाषणात मी खासदारांना विचारले कि ‘ताराराणी कोण आहे ते माहिती आहे का?’ दुर्दैवाने कुणालाच माहित नव्हते. असेच मी अनेक सभेमध्ये लोकांना विचारले. पण दुर्दैवाने पूर्ण महाराष्ट्रात क्वचित कुणीतरी सापडतं. ज्यांना ताराराणी माहित आहे. शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या, राजाराम महाराजांची धर्मपत्नी, शिवरायांची सून. जी पूर्ण इतिहासात जगातील सर्वश्रेष्ठ स्त्री योद्धा आहे. २५ वर्षाची विधवा स्त्री घोड्यावर बसून तलवार घेऊन थेट औरंजेबच्या छावणीवर हल्ला करणारी ताराराणी तीचे नाव इतिहासातून मिटवून टाकल. कारण धर्म मार्तंडानी तेची हेटाळणी केली, कारण स्त्री ही योद्धा होऊ शकत नाही. स्त्रीचे काम फक्त चूल आणि मुल असत. म्हणून ताराराणी सारख्या सर्वश्रेष्ठ योद्धयाचे नाव इतिहासातून मिळवून टाकल. म्हणून मी मागणी केली कि आज मुली सैन्यात का नाहीत? सुदैवाने सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि पंतप्रधानांनी ताबडतोब मुलींना सैन्यात घेण्याचे आदेश दिले. त्यातील एक माझ्या गावाची पूनम सावंत ही सैन्यात अधिकारी झाली. आज मुली सैन्यामध्ये कंमाडो बनत आहेत. हा केवळ मुलींना रोजगार देण्याचा प्रश्न नव्हता पण स्त्रियांना सन्मान देण्याचा प्रश्न होता. माझ्या मुलींना समाजामध्ये स्थान देण्याचा नेहमी अट्टाहास राहिला. म्हणून जेव्हा पंचायत राज विधायकासाठी आम्ही हट्ट धरला त्यावेळी लोकसभेत महिलांना ३३% आरक्षण देण्याची मागणी केली. ती मंजूर झाली आणि आज अनेक गावामध्ये महिला सरपंच झाल्या, सदस्य झाल्या.
तिसरी गोष्ट मला सांगायची आहे कि युनोमध्ये लोकसंख्या कमी करण्याच्या स्पर्धेसाठी गेलो होतो. त्यातून निष्कर्ष निघाला कि मुली शिकल्या तर लोकसंख्येला टाळा घालता येईल आणि भारतात परत आल्यावर कॉंग्रेस संसदीय कमिटी मध्ये मी ज्याचा सचिव होतो, तेथे प्रस्ताव मांडला कि प्रत्येक शाळेमध्ये मध्यान्ह भोजन देण्यात यावे. ते मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये तेच विधायक आणले. पूर्ण भारताच्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन सुरु झालं व आज देखील सुरु आहे. तसेच पोलिसांमध्ये सुद्धा स्त्रियांना आरक्षण असावे अशी मागणी केली व ती पण लागू करून घेतली. गेल्या २५ वर्षामध्ये स्त्रियांना प्रचंड वाव निर्माण केला. हे सर्व जिजामाता व सावित्रीबाई यांच्या प्रेरणेने केले. हाच खरा महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा आहे.
जिजामाता, सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून आपण काय शिकलो? हा प्रश्न आज देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्त्रिया सक्षम होत असताना खाजगीकरणाच्या बडग्याखाली सरकारी नोकऱ्या संपत आलेल्या आहेत. सरकारी नोकऱ्या पुढच्या काळामध्ये कमी होणार नाहीत उलट वाढतील याची काळजी आपण सर्वाना घ्यावी लागणार आहे. ही गोष्ट संघर्षाशिवाय साध्य होणार नाही. म्हणून स्त्रियांनी आपला न्याय हक्क मिळविण्यासाठी संघटीत होऊन संघर्षासाठी तयार रहावे.
सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीच्या दालन सताड उघडलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्ये तरुणांना वाव मिळत आहे. पोलीस भरती, सैनिक भरती अशा क्षेत्रामध्ये स्त्रियांना मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्यातच आपला विजय आहे. त्यातच जिजामाता आणि सावित्रीबाईचा विजय आहे. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि छत्रपती ताराराणी यांचा इतिहास अलौकिक आहे. तो फक्त शौर्याचा नाही तर माणुसकीचा आहे. या सर्वानीच रयतेच राज्य बनवलं ते टिकवलं आणि घनघोर लढाया केल्या. अशा थोर वीरांचा इतिहास महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहे. ही दु:खाची बाब आहे किंबहुना माणूस घडवायला तो मावळा झाला पाहिजे आणि मावळा बनवायला आपल्या मुलाला ह्या इतिहासाचे बाळकडू पाजले पाहिजे. भारताचे भवितव्य घडवण्यासाठी सरकारने तत्काळ पाऊले उचलावी.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९