*आरक्षण बदलल्याचा उद्यानाला फटका*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व प्राणीसंग्रहालयाचे माझगाव येथील उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे आरक्षण बदलणार आहे. १,३०० चौरस मीटर जागेवर उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे आरक्षण बदलणार असल्याने राणी बागेचा विस्तार रखडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. दरम्यान, या जागेवर आता ‘रहिवाशी वापर’ असे आरक्षण निश्चित केले जाणार असून पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या आहेत.
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचा कायापालट होणार आहे. सध्या ३५० हून अधिक प्रजातींचे पशुपक्षी असून भविष्यात सिंह, जिराफ, कांगारू, अॅनाकोंडा, झेब्रा असे अनेक देश- विदेशातील अनेक नवीन पाहुणे येणार आहेत.
उद्यानाचा विस्ताराला मफतलाल मिलच्या जागी मिळणारी जमीन विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र माझगाव येथे असणारी १३०० चौरस मीटर जागेवर ‘मुंबईचा विकास आराखडा २०३४ मध्ये टाकलेले बगीचा व प्राणी संग्रहालयासाठीचे आरक्षण मात्र रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या प्रस्तावित विस्ताराला फटका बसणार आहे.
अधिनियम १९६६ कलम ३१(१) नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखड्यानुसार दर्शवण्यात आलेल्या उद्यान बगीचा (आरओएस१.५) अधिक प्राणी संग्रहालय (आरओएसर ३) चे आरक्षण वगळून ९ सप्टेंबर, २०१२ च्या अधिसूचनेनुसार संबंधित आरक्षण वगळून एकूण १३७३.७५ मीटर क्षेत्रफळाचा भूखंड रहिवासी वापरामध्ये बदलण्यात यावा, असा बदल सुचवण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या आहेत.