*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बोनस ! देवा दे रे….!!*
उरली सुरली मनी
आर्त धुन आहे रे !
तुझी घाई नसेल तर !देवा
अजून थोडावेळ गाऊ दे रे ..!
देवा अजून दे थोडासा अॅडव्हान्स
कोरा करून टाक !आमचा कॅनव्हास
थोराड खोडासारखे वाढलो
थोडं तरी आमच वय वाढू दे रे !!
अजूनही जगण्याची आहे उमेद
थोडासा अजून बोनस हवा रे !
देवा ! भूतकाळांतील आठवणींनी
घायाळ करू नकोस रे !
आता आकाशाकडे पहायचे नाही
तुझ्या पायाही पडायचं नाही रे !
अंतर्मनाच्या इजेला नकोस दुखवू
मागे वळून नाही पहायचं रे ..!
देवा ! अजून दे रे !थोडा अॅडव्हान्स
कोरा करून टाक! आमचा कॅनव्हास
छळून आमचा बोन्साय नको करू रे!
खुरटलो जरी असलो,शेवटचा बहर दे रे
पुन्हा एकदा उमलू दे रे..!बोनस दे रे..!
देवा ! घड्याळ्याचं अलार्म बटन
तू जरा काढून टाक !
तेवढं तर तू करू शकतो..
अन् वेळेचा बोनस देवून टाक !
तुझ्या यादीतून नाव आमची
सध्यातरी काढून टाक!
तस तू चित्रगुप्ताला सांगून टाक!
बाबा ठाकूर