टोलमुक्त कृती समितीच्या वतीने कणकवली पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर!
कणकवली
हळवल फाटा येथे झालेल्या आरामबसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात आणखी काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात व यापूर्वी याठिकाणी घडलेल्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी जबाबदार आहे. महामार्ग प्राधिकरणावर व ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी टोलमुक्त कृती समिती व आम्ही कणकवलीकर च्यावतीने पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची भेट घेऊन करण्यात आली. दरम्यान, दोन दिवसांत याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री. जाधव यांनी दिले. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनायक मेस्त्री यांनी दिला.
सदरचे अपघात ज्या धोकादायक वळणावर होत आहेत, त्याठिकाणी अपघात सदृश्य परिस्थिती महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आहे. सातत्याने शासन दरबारी तक्रारी होऊनही सदरच्या ठेकेदार कंपनीने अपघात न होणेच्या दृष्टिने कोणतीही कार्यवाही करत नाही. या रस्त्याचे सदोष बांधकाम केल्याने याठिकाणी सातत्याने अपघात होऊन जीवितहानी होत आहे. तरी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी दोन दिवसांत याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विनायक मेस्त्री, नितीन म्हापणकर, द्वारकानाथ घुर्ये, रुपेश खाडये, संजय मालंडकर, सिकंदर मेस्त्री, रंजन चिके, सादीक कुडाळकर आदी उपस्थित होते.