*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार दिनेश मोडोकार लिखित अप्रतिम गझल अन् भोन ता.संग्रामपूरच्या ऐतिहासिक साम्राज्याच्या ढासळलेल्या निशाणी वर केलेले भाष्य*
हाल जाहले फार घराचे
उरले केवळ दार घराचे
ढासळलेले छप्पर म्हणते
थकलो झेलुन वार घराचे
दारावरची नक्षी रडते
झाले पारावार घराचे
सुन्न ललाटी केविलवाने
भोग बदलले फार घराचे
उठबस दारावरची गेली
भाग्य जणू या ठार घराचे
दारावरचे तोरण सुकले
ढासळले सिनगार घराचे
© दिनेश मोडोकार..
पाथर्डी 9767 3967 44
छायाचित्रातील हा दरवाजा कुण्या राजवाड्याचा नसुन भोन ता. संग्रामपूर जि. बुलढाणा येथील आहे. भोनच्या ऐतिहासिक सम्रुध्दतेचे ढासळलेले निशाण आहे…
प्रश्न पडतो एवढी सम्रुध्दता गेली कुठे, शोधू कुठे…..
ही.संमृध्दता पुन्हा परतेल का ?
केवळ वाड्याचा दरवाजा एवढा श्रीमंत तर तो काळ किती वैभवशाली असेल, वाड्यात राहणारी माणसे कशी असतील…
सातवाहन काळातील एक मोठे व सम्रुध्द शहर म्हणून एकेकाळी याच भोन ची ओळख होती.पुण्यातील डेक्कन काँलेज च्या पुरातत्व विभागाने इथे काही वर्षांपूर्वी उत्खणन केले होते. तेंव्हा त्यांना सातवाहन काळातील नाणी. शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधून ठेवलेल्या कित्येक रींगवेल तसेच बौध्दकालीन स्तुप आढळून आले. कित्येक भग्न बांधकामाचे अवषेश येथील उत्खणनात आढळले. त्या बांधकामासाठी ज्या विटा वापरल्या गेल्या होत्या त्या विटांची माती गंगेच्या खोऱ्यातील आहे हे सिध्द झालेले आहे..
पयोष्णी नदिच्या तिरावर वसलेल्या या भोन गावामधे आपण आजही आलात तर आपल्याल्या येथील प्रत्येक दगड धोंड्यांमधे सुध्दा पुरातन साद ऐकायला येते…
प्रख्यात गजलकार व माझे मित्र अरविंद उन्हाळे हे याच भोनसम्रुध्दतेचे गावाचे. मागील वर्षी एका कविसंम्मेलणाच्या निमीत्ताने त्यांच्या गावातून जाण्याचा योग आला, व या वैभवशाली एतिहासिक वारसा लाभलेल्या भोन या गावाच्या पुरातन सम्रुध्दतेचे दर्शन झाले . अरविंद उन्हाळे यांचे वडील आ. गुणवंतरावजी उन्हाळे पाटील यांच्याकडे यातील बरेचसे पुरावे आजही हजर आहेत… त्यांच्या बोलण्यातून बरेचदा या खुणा डोकावतात. श्री गुणवंतरावजी उन्हाळे यांचे वडील स्व रामराव पाटील उन्हाळे हे सुध्दा फार मोठे साहीत्यीक होते , त्यांनी त्यांच्या साहीत्यीक जिवनात कित्येक कविता गजला , कवणे , पदे यांची निर्मीती केली .त्यांचे जेष्ठ बंधू स्व पुडलीकराव उन्हाळे पाटील हे एक दैवी व्यक्तीमत्व व तत्कालीन सम्रुध्द साहीत्य परंपरेचा वारसा लाभलेले थोर समाजसेवी व साहीत्यीक होते . त्यांनी विपूल प्रमाणात साहीत्य लिखाण केले पण काळाच्या ओघात त्यांचे मोचकेच साहीत्य आज श्री गुणवंतरावजी उन्हाळे यांच्या मुखोद्गत आहे.. एकदा मोठ्या पावसात घराचे छप्पर गळले व दुर्दैवाने त्यांचे अनमोल हस्तलिखिते पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे नष्ट झाली.त्यात भोनच्या वैभवशाली ऐतिहासिक पुरातन नोंदी व अनेक पुरावेही नष्ट झाले.
येथील लिंगेश्वर मंदीर हे अतिशय प्राचीन असून त्याच्या अनेक पौराणिक आख्यायीका त्यांनी सांगीतल्या ..
अनेक पडके वाडे , इमारती मातीचे ढीगारे ,जुनी घरे , ढासळलेल्या वाडेवजा घरांचे अजूनही ताठ मानेने उभे असलेले दरवाजे आपल्याशी काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत असाच भास होतो….
© दिनेश मोडोकार..
पाथर्डी 9767396744