मालवण / मसुरे :
भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु.किशोर चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेलया बद्दल किशोर चव्हाण यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार 29 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात देण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. मंचकराव डोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. अकबर मकानदार, निती उराडे, प्रा. प्रकाश नाईक उपस्थित असणार आहेत. किशोर चव्हाण यांच्या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.