आमदार वैभव नाईक यांनी ठणकावले
सिंधुदुर्ग
औषधी वनस्पती संशोधन केंद्र हा प्रकल्प दोडामार्ग आडाळी येथेच होणार आहे. त्याबाबतची मान्यता मिळाली आहे.भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी विनाकारण लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवू नयेत. अलीकडे शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता, घोटगे सोनवडे घाटाचा प्रश्न खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, व आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्री महोदयांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ज्याप्रमाणे सुटले आहेत,त्याप्रमाणे औषधी वनस्पती संशोधन केंद्रही सिंधुदुर्ग मध्ये उभारल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा ठाम विश्वास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गसाठी मंजूर झालेला औषधी वनस्पती संशोधन प्रकल्प भाजपचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले यामुळेच या प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला होता.आता देखील हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सूरु होत्या.मात्र हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दिपक केसरकर,व आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली.त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत यांची बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग मधील या प्रकल्पाकरिता आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात यावा असे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खा.राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सुध्दा भेट घेतली असून ते देखील सिंधुदुर्ग मध्ये हा प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहेत. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकसमोर या प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदर प्रस्ताव मान्य करून लवकरात लवकर आडाळी येथे औषधी वनस्पती संशोधन केंद्राचे काम प्रत्यक्षात सूरु होईल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.