जिल्हयांमध्ये प्रत्येक घरा घरात मोफत मास्क व सेनिटायझर वाटप योजनेस जि.प.सत्ताधाऱ्यांचा विरोध.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हयांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीमधून सिंधुदुर्ग जिल्हयांतील प्रत्येक घरात मोफत मास्क व सेनिटायझर वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जि.प.आरोग्य विभागाकडे देण्यात आलेली होती. त्यामुळे आरोग्य विभागांमार्फत सिंधुदुर्ग जिल्हयांमध्ये प्रत्येक घरामध्ये मोफत मास्क व सेनिटायझर वाटप करण्यासाठी जि.प.स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर होणे आवश्यक होते. परंतु शुक्रवार दि. 16 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या सिंधुदुर्ग जि.प.स्थायी समितीमध्ये सत्ताधारी सदस्यांनी सदर ठरावास विरोध केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा श्रेयवाद व राजकारण महत्वाचे वाटत आहे व त्यांचा कारभार जनता विरोधी आहे हे सिद्ध होते. त्यामुळे लोकांना आरोग्याच्या दृष्टीने मोफत मिळणाऱ्या सुविधेस विरोध करणारे सत्ताधारी पक्षाचे सदस्य हे खरोखरच लोकप्रतिनिधी आहेत की सरंजामशाहीतील सुभेदार आहेत असा प्रश्न आता पडला आहे. जि.प.मधील सत्ताधारी सत्तेच्या मस्तीत आणि गुर्मीत आंधळे होवून आपण जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत हे विसरलेले आहेत. हे त्यांच्या या कृतीवरुन दिसून येते. ही बाब अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणाऱ्या जनतेसाठी दुदैवी आहे. लोकसेवक म्हणून कर्तव्याचा विसर पडलेल्या जि.प.तील लोकप्रतिनिधींकडून जनतेने काय अपेक्षा धराव्यात हे समजण्यापलीकडे आहे. परंतु आमचे पालकमंत्री, खासदार, आमदार हे जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी कटीबंध आहेत व कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हयांतील लोकांना मास्क व सेनिटायझरचे वाटप होणार आहे.
तसेच गेल्या 2 दिवसांपूर्वी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी नेते शेताच्या बांधावर येवून भारे बांधणार काय? अशा प्रकारचा थिल्लर प्रश्न उपस्थित केला होता. आता रविवार दि. 25 ऑक्टोंबर 2020 रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्मानिय श्री.प्रविण दरेकर हे सिंधुदुर्ग जिल्हयांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर पिक नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत असल्याचे समजते. तरी आता आमचे प्रमोद जठार यांना असे सांगणे आहे की, प्रमोद जठार यांनी त्यांच्या संकल्पनेतील भारे बांधणे कार्यक्रम रविवारी कोठे आयोजित केला आहे तो घोषित करावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागेंद्र परब सदस्य जि.प.सिंधुदुर्ग यांनी केले आहे.