दोडामार्ग
तालुक्यातील आदर्शवत ग्रामपंचायत अशी ओळख असणाऱ्या केर – भेकुर्ली ग्रामपंचायतीने मकरसंक्रातीला अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीने वाढदिवसानिमित्त किंवा अन्य कोणत्याही आनंदाच्या क्षणी कुंडीसह झाड ग्रामपंचायतीला द्यावे असे आवाहन केले आहे. ते झाड जगवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नवत राहील यामुळे आपला आनंदी क्षण निरंतर राहून गावाच्या सौंदर्यात भर पडेल यासाठी हे आवाहन केल्याचे ग्रामपंचायत आणि आदर्शगाव समिती यांच्याकडून सांगण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना सांगण्यात आले की, ज्या – ज्या वेळी गावातील विविध उपक्रमात ग्रामस्थांना हाक देण्यात आली. त्या – त्या वेळी ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली त्यामुळे गावची आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. मकरसंक्राती निमित्त एक नवा संकल्प करण्यात आला.
गावातील ग्रामस्थांचा आदर्शगाव नावाने व्हाट्सअप ग्रुप आहे. त्यावर गावातील अनेकांचे वाढदिवस किंवा अभिनंदन पोस्ट प्रसिद्ध होत असतात ही आठवण आमच्यासाठी स्फूर्तीदायी असते पण या आठवणी चिरंतन राहव्यात असे प्रत्येकाला वाटते. गाव निसर्गसंपन्न आहेच पण तो फुलांनाही अधिक समृद्ध व्हावा आणि हा आनंदाचा दिवस गावाच्या सौंदर्यातही भर टाकणारा ठरो असे मनोमन वाटते. त्यासाठी आपला वाढदिवस असेल किंवा आनंदादाचा क्षण त्या दिवशी एक झाड कुंडीसह आपण जर भेट दिले तर ते चव्हाटा मंदीर, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा आदी ठिकाणी ठेवले जाईल. त्याला पाणी घालून वाढवण्याचे नियोजन केले जाईल. असे आगळे – वेगळे नाते जोडायचे असल्यास सदर कुंडीसह झाड आदर्श गाव केर – भेकुर्ली ग्रामपंचायत कार्यालय येथे आणुन द्यावे असे आवाहन करीत ग्रामपंचायतीने आदर्शवत उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.