You are currently viewing कुडाळ येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वॉकेथॉन रॅली संपन्न

कुडाळ येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वॉकेथॉन रॅली संपन्न

कुडाळ :

 

कुडाळ शहरामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत 6 किलोमीटर वॉकेथॉन चे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने व रोटरी क्लब, कुडाळ, लायन्स क्लब कुडाळ व गिअर अप जिम कुडाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या वॉकेथॉन चा आरएसएन हॉटेल चौकातून शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याहस्ते फित कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी बोलतांना श्री. नंदकिशोर काळे म्हणाले की सध्या रस्त्यावर होणारे अपघातात मोठी वाढ झाली आहे. रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनांद्वारे धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. हे अपघात होऊ नयेत, यासाठी रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालण्याने मागील वाहन दिसत नाही व अपघात होतात. त्यामुळे उजव्या बाजूने चालल्यामुळे पुढून येणारे वाहन दिसते व यामुळे अपघात होणार नाहीत. त्यामुळे लोकांनी चालताना उजव्या बाजूने चालावे व वाहन चालकांनीही रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी या वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.”

ही वॉकेथॉन रॅली आरएसएन हॉटेल पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर कॉलेज चौक, गवळदेव चौक, पोलीस स्टेशन, एस. टी. स्टॅन्ड, आंबेडकर चौक, गुलमोहर हॉटेल, नवीन बस स्टॅन्ड ते पुन्हा आरएसएन चौक अशी मार्गक्रमित करण्यात आली होती.या रॅलीत शकडो नागरिकांचा सहभाग घेतला.यामध्ये कुडाळ विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लब व लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य, तसेच गिअर अप जिमचे सदस्य, शहर व परिसरातील मोटर ड्रायविंग स्कुल चे प्रतिनिधी, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वॉकेथॉन मध्ये सहभागी सर्व नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात व सहभागी ज्येष्ठ नागरिकांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा