कणकवली
आठवडाभर मुसळधार कोसळणार्या परतीच्या पावसाने कोकणातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर गावोगावी भातशेतीच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील शिरवल येथील नुकसानग्रस्त भागातील भातशेतीची कृषीसहाय्यक सौ. व्ही. व्ही. ठाकूर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली, व शेतकर्यांशी संवाद साधला. आणि संयुक्त पंचनामे करण्यात आले. यावेळी शिरवल सरपंच महेश शिरवलकर, ग्रामसेवक राजेंद्र गुरव, पोलिसपाटील विजय शिरवलकर, तलाठीअर्जुन घुनावत, राजेश शिरवलकर, शेतकरी लवु राणे, सुरेश राणे, मनोज राणे, चंद्रकांत कुडतरकर, तुळशीदास कुडतरकर, प्रवीण कोरगावकर, रामचंद्र कुडतरकर, राजाराम गुरव, सुरेश गुरव, भिकाजी सावंत, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. शिरवल पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांचे भातशेतीचे नुकसान हे सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे झाले आहेच. पण त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने अक्षरशः नद्या नाल्याना पूर आणला होता. यामुळे शिरवल गावातील भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने कायम हिरावून घेतला आहे. कोकणात परतीच्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे उत्पादक पीक म्हणून भात शेतीकडे पाहिले जाते.शिरवल गावातील भातशेतीला सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.