राज्यस्तरीय कार्यक्षेत्रअसलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे गावात पर्यावरण संतुलनासाठी ‘स्वच्छ गाव सुंदर गाव हरित गाव’ या संकल्पनेतून सोमवारी १६ ते १८ जानेवारी अशी सलग तीन दिवस स्वच्छता व जनजागृती मोहीम राविण्यात येणार आहे. जिल्ह्याला आदर्शवत ठरणाऱ्या स्वच्छतेच्या या जागरात संपूर्ण विलवडे गाव सहभागी होणार आहे.
या मोहिमेत गावातील प्लास्टिकसह ओला व सुका कचरा तसेच विघटन न होऊ शकणाऱ्या वस्तू व धातू गोळा करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता मंत्र व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू करण्याबाबत तसेच सर्व प्रकारच्या कचरा व्यवस्थापनाबाबत पर्यायाने पर्यावरण संतुलनाबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर विलवडेवासीय स्वच्छता व पर्यावरण संतुलनाबाबत शपथ घेणार आहे.
विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र धर्माजी दळवी आणि त्यांच्या पत्नी सौ सीता दळवी यांनी राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशनची मुंबईत स्थापना केली आहे. शिक्षक सक्षमीकरण हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थापन झालेली ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे.
या स्वच्छता व पर्यावरण रक्षण जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनच्या संस्थापक सौ सीता दळवी आणि रामचंद्र ऊर्फ आबा दळवी तसेच विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केले आहे.