सिंधुदुर्गनगरी :
पुणे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने शानदार कामगिरी करत जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण,आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत. पूर्वाच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी विषेश अभिनंदन केले आहे.
पूर्वाने महाराष्ट्र मिनी ओलंपिक क्रीडा स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात ४ x २०० मीटर रिले मध्ये व वॉटर पोलो मध्ये दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत तर ८०० मीटर फ्री स्टाइल व १५०० मीटर फ्री स्टाइल जलतरण प्रकारात दोन कांस्य पदके पटकावली आहेत. पुर्वाने या आधी राज्य व राष्ट्रीय पातळीवर जलतरण क्रीडा स्पर्धेत मेडल पटकावले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालयातर्फे पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी पुणे येथून खेळणारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधूकन्या पूर्वा संदीप गावडे हिने जलतरण मध्ये विविध प्रकारात घवघवीत यश मिळवले आहे. जलतन क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. तर बक्षीस वितरण क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटू या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. पूर्वाही पुणे क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे तर याच ठिकाणी दहावीची शिक्षण ही घेत आहे.