वेंगुर्ला
राजमाता जिजाबाई यांनी केवळ शिवबांनाच घडवले नाही तर असंख्य महिलांनाही प्रेरणा दिली. आजही अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना दिसतात ही अभिमानस्पद बाब असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर यांनी व्यक्त केले.
वेंगुर्ला शाळा नं. ४ येथे शिक्षक पालक यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन उपाध्यक्ष प्रज्ञा परब यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, अस्मिता राऊळ, माजी नगरसेविका कृतिका कुबल, योगिता लोकरे, मुख्याध्यापिका संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब, बोडके, पालक जाधव, देसाई, अंगणवाडी सेविका आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. याच शाळेतील शिक्षिका लीना नाईक यांना वेताळ प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पालक व शाळेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.