*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांनी “कवितेच्या पारंब्या” या कवी प्रा.डॉ.यशवंतराव पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे केलेलं समीक्षण*
*काव्यसंग्रह….कवितेच्या पारंब्या*
कवी… प्रा.डॉ .यशवंतराव पाटील नाशिक
नुकताच आ.जेष्ठ कवी ,लेखक ,साहित्यिक,
सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले प्रा.डॉ.यशवंत पाटील नाशिक ,यांनी पाठवलेला “कवितेच्या पारंब्या” हा काव्यसंग्रह हाती पडला आणि खरंच खूप आनंद झाला. मी फार मोठी लेखिका नाही पण सरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा…!
वाचन सखोल असावं, मनःपूर्वक असावं या विचाराची मी, त्यामुळे
सरांच्या एकेक कविता लक्षपूर्वक वाचल्या आणि सध्या फक्त
नजर टाकावी म्हणून हाती घेतलेला हा संग्रह पूर्णपणे वाचून सुद्धा झाला. संवेदना प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला आहे.
“कवितेच्या पारंब्या” हे नाव मुखपृष्ठावर अगदी साजेसं रुप लेऊन आलेलं, त्यावरूनच आतील कवितांची व्याप्ती उलगडत जाते. आ.संजय चौधरी सरांची सर्वोत्तम प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. एकंदरीत मुखपृष्ठ आणि प्रस्तावनेतून आ.यशवंत सरांचे काव्य वाचण्याची जिज्ञासा जागृत होते…!
वाचत असताना जाणवलं ते प्रथमतः सरांची साधी, सरल शब्दशैली…! दुर्बोध नसलेली,अत्यंत रसाळ,तरल पण सर्व विषय अत्यंत सुंदर रीतीने कवितेतून रचण्याची शैली मनाला मुग्ध करते. जुन्या पिढीतील काही कवींच्या रचनांची या शैलीतून आठवण झाल्याशिवाय रहात नाही. काव्यसंग्रहात विविध विषयांवर कविता रचलेल्या आहेत..आणि त्याप्रमाणे सर्व भाव शब्दांमधे प्रभावीपणे दिसून येतात. जेष्ठत्वातील अनुभव,, कॉलेज आणि नोकरीतील तसेच सामाजिक जीवन व प्रश्नावर अत्यंत संयत शब्दात सरांनी उत्कृष्ट कविता रचल्या आहेत. प्रेम कवितेतील हळवे भाव देखील शब्दातून सुंदर रेखाटले आहेत.
कविता म्हणजे प्रतिभेच्या शेतातील बीज, याचा वटवृक्ष मग कल्पनेतून फोफावत जातो…ही पहिली कविता आत्मिक सुख देते.
“कथनी आणि करणी”,प्रेमाच्या खुशीत अन् कुशीत”, प्रेम या कवितांमधून हळवे कातर भाव आहेत, “प्रेम”या कवितेत त्याचे उदात्त स्वरूप …
शांताबाई शेळकेंच्या कविता वाचल्या नाही असं कुणीच नसेल ,फार सुंदर शब्दालंकाराने त्यांच्या कवितेवरील भाष्य आहे, अगदी अभ्यासपूर्ण…… चिमणाचिमणी, प्रणयाची खेळीमधे सर्वसामान्य जीवनानुभव ज्या छोट्याशा गोष्टीतूनही मनाला आनंद देतात.. प्रसिद्धी आणि किर्ती ही दिर्घ कविता..आणि अशा ब-याच दीर्घ कविता आहेत, पण त्या वाचताना रटाळ वाटत नाहीत.
राजकीय ,सामाजिक विषयांवरही समतोल ठेऊन लिहिलेल्या कविता मनाची पकड घेतात. विशेषतः गांधी विचारांवरील सगळ्या कविता खूपच आवडल्या. हत्येने विचार मरत नाही, विनाशस्र, अहिंसेच्या पुजा-याचे विचार यांची सरांच्या काव्यातून, कवितेतून पुन्हा उजळणी झाली, जे काळासोबत लोप पावत चालले पण समाजाला गरजेचे आहे.
राज्यघटना, संविधान, “आहे का अधिकार.”. “आकाशाएवढे बापू ” यातून सरांच्या अभ्यासपूर्ण, सत्य आणि प्रामाणिक विचारांची साक्ष पटते. गांधी विचारांचा प्रभाव व ते कविततून अत्यंत पोटतिडकीने व्यक्त झालेले, फार आवडले. गानसम्राज्ञी ही दीर्घकविता स्वरांवरील भक्ती आदर छान दर्शवते. ते स्वर माधुर्य पुन्हा मनावर स्वर्गीय तरंग उमटवते.
विवेकानंद व अनेक महान व्यक्तींवर सुंदर भाष्य ..तसेच “नद्यांचे आक्रंदन” मधून विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी घुसमट व होणारी क्षती कवितातून अत्यंत बोलकी झाली आहे. नक्कीच विचार करायला लावणारी अशीच….!
“विवाहानंतरचे प्रश्न”, “वार्धक्य”
व अशाच काही कवितेत सामाजिक प्रश्नाचा उहापोह निश्चितच योग्य.
एकंदरीतच अनेक कविता साध्या, रसाळ ,व समाज सुधारणावादी विचारांना प्राधान्य देणा-या. सरांचा प्रामाणिक स्वभाव, सत्य पटणा-या साध्या पण वैचारिकतेने संपन्न अशा स्वभाव व लेखणीची साक्ष या कविता
देतात. कुटुंबातील वत्सल व्यक्ती, सामाजिक जीवनातील
मार्गदर्शक, उत्तम कार्यकर्ता, प्रामाणिक सज्जन विचारवंत, अभ्यासक आणि
भावनाशील हळवा उत्कृष्ट कवी म्हणून डॉ.यशवंत पाटील यांचा हा काव्यसंग्रह..अथ ते ईतिपर्यंत सर्वांग सुंदर वाटला. एक सुंदर अनुभूती “कवितेच्या पारंब्या”
या संग्रहातून मिळाली. अत्यंत सुंदर असा हा संग्रह नक्की प्रत्येकाच्या जवळ असावा…!
मला या सुंदर संग्रहावर लेखन करायचा सुयोग आ.पाटील सरांनी दिला त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे!🙏
०००००००००००००००००००
कवयित्री…अरुणा दुद्दलवार
दिग्रस, यवतमाळ
मो…..९७६५९३४०२५