*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*आधी वंदू तुज श्री गणेशा*
एकदंतं महाकायं लंबोदरं गजाननं
विघ्ननाशकरं देवम् हेरंबं प्रणमाम्यहम् !!
हे श्री गणेशा, तू गणेश म्हणजे शिव पार्वतीची सेवा करणाऱ्या गणांचा इश… अधिपती…!
पुराणात असं म्हटलंय की, द्वारपाल नंदीस झुगारून शंकरांनी न्हाणी घरात प्रवेश केला, तेव्हा अपमानित आणि रागाने क्षुब्ध होऊन पार्वतीने मळापासून एक सुंदर मूर्ती निर्मित करून त्यात प्राण फुंकले आणि कुमारास दारपाल म्हणून नियुक्त करून स्नानास गेली असता शंकर तिथे उपस्थित झाले…
कुमाराने शंकरांना रोखले असता युद्ध झाले त्यात शिव समेत सर्व देवतागण पराभूत झाले. नारदाच्या सल्ल्याने विष्णुद्वारे कुमारास मोहित करून शकरांनी त्याचे मुंडके उडविले… परंतु ही गोष्ट पार्वतीला समजताच तिने पृथ्वी विनाशाला सुरुवात केली… तेव्हा कुमाराचे मुंडके कुठेही न मिळाल्याने शंकरांनी प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मुंडके आणण्याच्या आज्ञेनुसार आणलेले गजाचे मुंडके कुमाराच्या देहावर लावले…जिवंत केले…तोच कुमार म्हणजे तूच श्री गणेशा ना….!
*”गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया”*
हे गणेशा…कार्यारंभी तुला प्रथम वंदन करतात… तुझे मनोमन स्मरण करूनच इष्ट काम करतात… ज्ञानेश्वरांची “ज्ञानेश्वरी” असो वा श्रीएकनाथांची “भागवत”…या ग्रंथारंभी आत्मरुपी तुझाच जयजयकार केला आहे…
हे गणेशा…तू लंबोदर म्हणजे एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे
*“तुजमाजी वासु चराचरा । म्हणोनि म्हणिजे लंबोदरा । यालागी सकळांचा सोयरा । साचोकारा तू होसि ॥”*
चराचर विश्व तुझ्यामध्ये वसले आहे आणि म्हणूनच तुझे उदर लंबोदर, म्हणजे लांब झाले आहे. यामुळेच तू खऱ्या अर्थाने सर्वांचा सोयरा आहेस.
अनंत ब्रम्हांडे तुझ्या उदरात सामावतात म्हणून तर तू महोदर म्हटला जातोस… किती महाकाय असेल देवा तुझे उदर…!
हे मूषकवाहना….
म्हणून तर मलाही एक प्रश्न पडलाय…
एवढासा उंदीर मामा कसा काय तुझं वाहन असेल…?
तू तर महाकाय…. मग उंदीर मामा कसा काय तुझं ओझं वाहून नेत असेल…?
पण म्हणून तर संत श्रीएकनाथ त्यालाच उद्देशून म्हणतात,
*“सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान । त्यामाजी तुझे अधिष्ठान । यालागी मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥”*
म्हणजे सुक्ष्मातिसूक्ष्म वस्तूतही तुझे अधिष्ठान आहे…
जडद्रव्याचे सूक्ष्म कण म्हणजे अणूरेणू…त्यातही कैक पटीने सूक्ष्म असलेला आत्मारुपी श्री गणेश आहे…या सूक्ष्मातिसूक्ष्म श्रीगणेशाचे त्याच्यापेक्षा मोठा असलेला उंदीर वाहन असूच शकतो… म्हणूनच तुला मूषकवाहन असे संबोधिले आहे.
*”तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता..*
*अवघ्या दीनांच्या नाथा…*
*बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे*
*चरणी ठेवितो माथा…”*
हे सुखकर्ता, तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही लाभाची ज्याला अपेक्षा नसते. अशा भक्ताला तू स्वहस्तें आत्मानंदरूपी हर्षाचे मोदक देऊन सुख, समाधान व शांती देतोस असं म्हणतात….
किती रे विश्वास तुझ्या भक्तांचा तुझ्यावर…तुझ्या चरणकमलांवर माथा टेकवून भक्तिभावाने तू केलेल्या उपकारामुळे ते नतमस्तक होतात…आणि तू सुद्धा दीनांच्या आयुष्यातून दुःखाचे हरण करून सुखप्राप्ती करून देतोस…जेव्हा तू अदृश्य असताना भक्तांना तू सोबत असल्याची जाण होते, भास होतो तेच तुझं अदृश्य दर्शन मनाला सुखावून नेतं…हेच खरे भक्तीचे आणि परमार्थाचे स्वरूप होय…
*“तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा संसारू । यालागी विघ्नहरू । नामादरू तुज साजे ॥*
तुला गणपतीला जो मानव पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो. त्याचे संसाररूपी विघ्न लय पावते. म्हणून मोठ्या आदराने दिलेले ‘विघ्नहर’ हे नाव तुला साजेसे आहे.
खरंच अगाध आहे रे तुझी माया विघ्नहर्त्या…!
हे वक्रतुंडा, कुणी तुझं तोंड वक्र आहे म्हणून वक्रतुंड म्हणतात…परंतु जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसता व जे तुमचे यथार्थ स्वरूप जाणतात, त्या ज्ञानवानांना तुम्ही नित्य सरळसोंडी, सन्मुखच आहात’ असेच भासत असते.
हे गणपती…
मुद्गल पुराणात तुझे आठ आवतार सांगितले आहेत. प्रथम वक्रतुंड…एकदंत…महोदर… गजवक्र… लंबोदर… विकट… विघ्नराज… धूम्रवर्ण…
आणि गणेश पुराणात तुझे चार अवतार सांगितले आहेत…जे सत्य, त्रेता, द्वापर, अन् कलियुगात झाले असे म्हणतात….
सिंहावर बसून येणारा…दशभुजाधारी, रक्तवर्णी महोत्कट विनायक…!
मयुरावर स्वार होणारा सहाभुजाधारी श्वेतवर्णी मयुरेश्वर…!
उंदरावर बैसोनी येणारा चतुर्भुज रक्तवर्णी गजानन…!
निळा घोडा वाहन असलेला द्विभुज अथवा चतुर्भुज धूम्रवर्णी धुम्रकेतू…!
हे पार्वतीनंदन शंकरसुता…तुझे सर्वच अवतार हे मनुष्य जन्माच्या हिताचे…सार्थक करणारे होते…
म्हणून तर तुझे गणेश चतुर्थीला घरोघरी आगमन होताना प्रत्येकाच्या मुखात तुझी आरती, गाणी गुणगुणली जातात…
*”या भजनी बाप्पा नाचती अंगणी पायाकडे पाहुनी…*
*थुई थुई थुई थुई मोर नाचे…मोराच्या तालावर बाप्पा नाचे”*
हे बुद्धीच्या देवते…आजही सण सोहळ्यात…पूजेत आधी तुझं पूजन…तुला वंदन करतो…
बाप्पा तू तुझ्या लेकरांना गुण्यागोविंदाने नांदण्याची…राग, द्वेष, मत्सर दूर सारून प्रेमाने मन जिंकण्याची…आपले, परके भेदभाव न जोपासता माणुसकी जपून…झाले गेले विसरून…चांगलं ते आत्मसात करून…वाईटाचा त्याग करून…मुखी सदैव तुझे…ईश्वराचे नाव घेत जगण्याची बुद्धी दे रे….!
भगवंता….
आत्मरुपी श्री गणपतीशी सोहंभावे तद्रूपता अनुभवने म्हणजे अद्वरभावे त्यास नमन करणे होय…!
*नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव । नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तू पावसी..!!*
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६