*आजगावात ‘गोगटे गुरुजी प्रतिष्ठान’ ची स्थापना*
आजगाव-धाकोरे येथील पूज्य ग.के. गोगटे गुरुजी यांनी आजगाव मराठी शाळेत १९६५ साली शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेचे बीज रोवले आणि शाळेतून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागले. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ज्ञानदानाचा यज्ञ अनेक वर्ष चालविला. त्यांच्या पवित्र स्मृती चिरंतन रहाव्या म्हणून गुरुजींचे विद्यार्थी व त्यांना मानणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन त्यानी ‘पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान ‘ ची स्थापना केली आहे. विनामूल्य शैक्षणिक कार्य करू इच्छिणाऱ्या या संस्थेने दि.२१ नोव्हेंबर २०२२ पासून शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आजगाव मराठी शाळेत सुरू केले आहेत. आजगाव परिसरात मिडलस्कूल स्कॉलरशिपचे रोज तीन तास मार्गदर्शन वर्ग सुरू आहेतच, त्याशिवाय हायस्कूल स्कॉलरशिपचे वर्ग व सराव परीक्षाही सुरू करण्यात आल्या आहेत.
कुणाकडूनही पैसे न गोळा करता वा फी न आकारता ‘ज्ञानदान यज्ञ’ चालविण्यासाठी विनय सौदागर, माधुरी काकतकर, उदय नातू, प्रमोद नाईक, वंदना साळगावकर, दीपक प्रभू, हेमंत प्रभू, महेंद्र प्रभू,संजय पंडीत, शाम धाकोरकर, अविनाश जोशी, गिरीश बेहेरे, शाम बेहेरे, क्षमा पुराणिक, विजया आजगावकर , मंदाकिनी नाईक व श्यामप्रसाद तेंडुलकर हे विद्यार्थी एकत्र आले आहेत. गुरुजींचे चिरंजीव संतोष गोगटे आणि नातू गणेशप्रसाद गोगटे हेही सोबत आहेत. हे कार्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी वा यात सहभागी होऊ इच्छित असलेल्यांनी विनय सौदागर (मो. ९४०३०८८८०२) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.