You are currently viewing खैदा- कातवड ओझर- मालवण बसफेरी सुरू 

खैदा- कातवड ओझर- मालवण बसफेरी सुरू 

सरपंच सिया धुरी यांनी मानले एसटी प्रशासनाचे आभार

मालवण

कोरोना काळात बंद करण्यात आलेली मालवण ते ओझर व्हाया कातवड या मार्गा वरील एसटी बस फेरी पूर्ववत सुरु करण्याच्या कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांनी केलेल्या मागणीला एसटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही बस फेरी सोमवार पासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवरील शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून सरपंच सौ. सिया धुरी यांनी एसटी आगार प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मालवण आगारामधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी ही बसफेरी सुरु होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बस फेरी बंद करण्यात आली होती. कातवड येथून सुमारे पंचवीस ते तीस शालेय विद्यार्थी तसेच बहुतांश महिला भाजीपाला विक्रीसाठी तसेच जेष्ठ नागरिक व अन्य ग्रामस्थ दररोज मालवण ते कातवड असा प्रवास करतात. सर्व प्रवाशांना खैदा किंवा ओझर या ठिकाणी जाताना किंवा येताना नियोजित स्थळी पोहचण्याकरिता सुमारे तीन ते चार कि.मी चालत प्रवास करावा लागत होता. ही गैरसोय टाळण्याकरीता सदर मार्गावर “मालवण – खैदा- कातवड-ओझर-मालवण” या प्रमाणे नवीन बस फेरी चालू करावी, अशी मागणी कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, सदस्य व ग्रामस्थ यांनी मालवण आगार व्यवस्थापक यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. यावेळी सदस्य निकिता बागवे, नंदा बावकर, स्वप्नील परब, माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत चव्हाण, ग्रामस्थ राजेंद्र धुरी, सचिन माळकर, किशोर पवार, चेतन धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या मागणीची दखल घेत मालवण एसटी प्रशासनाने सोमवार सकाळ पासून या मार्गावरून एसटी बसफेरी सुरू केली आहे. सकाळी कोळंब सरपंच सिया धुरी व ग्रामस्थ यांनी एसटी फेरीचे स्वागत करत एसटी प्रशासनाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा