उपाध्यक्ष डॉ. दीपक परब यांची माहिती
मालवण / मसुरे :
गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जोपासून परब मराठा समाज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. 22 डिसेंबर 1963 रोजी पांडुरंग श्रीधर परब यांनी स्थापन केलेल्या परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव सन 2023 सालामध्ये विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉ. दीपक परब, सहसचिव जी एस परब, परब सहकारी पतपेढी मर्यादित च्या संचालिका सौ राधिका परब, परब मराठा समाज शिक्षण सेवा मुंबईचे सेक्रेटरी आणि परब मराठा समाज सदस्य मिलिंद प्रभू यांनी बांदिवडे येथे बोलताना माहिती दिली असून या बाबत प्रसिद्धीस एक प्रसिद्धीस पत्रकही दिले आहे.
यावेळी फेब्रुवारी 2023 पासून गावा गावातील परब बांधवांच्या गाठीभेटी घेऊन प्रत्येक गावात परब मराठा समाजाचा संपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. या संपर्क अभियानात परब मराठा समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव हे प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.
यानंतर 19 मार्च 2023 रोजी शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे सकाळी 10 ते 2 या वेळात महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात सहित सर्व परब बांधवांचा भव्य दिव्य कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर मराठा समाजातील महिलांसाठी महिला दिन सुद्धा विविध उपक्रमाने याच दिवशी संपन्न होणार आहे.
जुलै 2023 मध्ये मुंबई नजीक कार्यकर्त्यांचा मेळावा व पावसाळी महा शिबिर घेण्यात येणार आहे. या पावसाळी शिबिरामध्ये सर्व परब बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर 14 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे बालदिन साजरा करण्यात येणार असून यावेळी परब मराठा समाजातील बालकांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. 22 डिसेंबर 2023 रोजी मुंबई येथे परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवाची सांगता मोठ्या धुमधडाक्यात विविध मान्यवरांच्या उपस्थित विविध उपक्रमांनी करण्यात करण्यात येणार आहे.
या परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त इतर समाजातील सर्व ज्ञाती बांधवांना ही समाविष्ट करून घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच भविष्यात परब मराठा समाजातील मुले तसेच इतर समाजातील मुले शैक्षणिक सुविधांपासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाज नेहमी पुढे असतो. यापुढेही कोणत्याही समाजातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कैलासवासी जयवंत परब, विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री अनिल परब, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, जी एस परब हे नेहमी पुढाकार घेत असून भविष्यातही या मुलांच्या मागे हे मान्यवर आणि समाज राहणार आहेयाची ग्वाही सुद्धा डॉक्टर दीपक परब यांनी यावेळी दिली. परब मराठा समाजाची परब सहकारी पतपेढी म्हणून कार्यरत असून ही पतपेढी दादर, भांडुप, कणकवली, कुडाळ अशा चार ठिकाणी या पतपेढीच्या शाखा असून या पतपेढीच्या माध्यमातूनही दरवर्षी विविध समाजाभिमुख उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या पतपेढीला 41 वर्षे पूर्ण होत असून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्यासाठी ही पतसंस्था परिश्रम घेत आहे.
या पतपेढीच्या माध्यमातून समाजातील गरजूंना वेळोवेळी सुलभ कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले जात आहे. परब पतपेढी आणि परब मराठा समाजाच्या वतीने समाजातील गरजवंत गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते.
या हिरक महोत्सवाचे अवचित्य साधून परब मराठा समाज व इतर सर्व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ६० गुणवंतांचा यथोचित सन्मान करणार आहे.
या सर्वांना भव्य दिव्य अशा अनोख्या कार्यक्रमात परब बांधवांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत परब मराठा समाजाचा आगळावेगळा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याबरोबरच सर्व लहान थोर घटकांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून संपूर्ण वर्षभर विविध प्रकारच्या शालेय व शाळाबाह्य राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात येणार आहेत. याबाबतचे अधिकृत माहिती मागवून प्रसिद्ध केली जाईल. परब मराठा समाज हा कोणत्याही पक्षाचे लेबल न वापरता गुण्यागोविंदाने काम करत आहे. भविष्यात होणारा हीरक महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी परब मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, तसेच समाजाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अनिल परब, कार्याध्यक्ष जगदीश परब, सरचिटणीस जी एस परब, खजिनदार शरद परब, जनरल सेक्रेटरी शैलेंद्र परब आणि सर्व सदस्य प्रयत्न करत आहे.
परब मराठा समाजाच्या हीरक महोत्सवात परब मराठा समाजातील सर्व बांधवांनी हितचिंतक व सर्व समाजातील सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परब मराठा समाजाच्या वतीने उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, सहसचिव जीएस परब आणि सर्व सदस्यांनी केले आहे.