रेती उपसामुळे जमिनिसह शेती-बागायतीचे नुकसान : भरपाई देण्याची मागणी
बांदा
तेरेखोल नदीतील रेती उपसामुळे सातोसे व कास गावातील ग्रामस्थांची जमिनीसह शेती-बागायती पाण्यात वाहून गेली आहे. सदर जमिनीचा सर्वे करून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी व रेती उपसा कायमचा बंद करावा, अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे उपोषणास बसणार असल्याचा असल्याचा इशारा जगन्नाथ पांडुरंग पंडित व कास सरपंच प्रविण पंडित यांनी प्रशासनास दिला आहे.
सातोसे व कास गावाजवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असते. यावर आळा घालण्याची वारंवार मागणी करूही याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या स्वरूपात याचा मोठा फटका बसला. नारळाच्या झाडांसह शेती बागायतदार यांची जमीन पाण्यात वाहून गेल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न श्री.पंडित यांनी प्रशासनास विचारला.
जमिन व शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी तसेच रेती उपसा कायमचा बंद करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही 24 जानेवारीपर्यंत न केल्यास सातोसे व कास गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा जगन्नाथ पंडित यांनी दिला आहे.
दरम्यान, बांदा महसूल मंडळ अधिकारी आर.वाय. राणे यांनी कास येथे काल रेती उपसा संदर्भात पाहणी केली असता काही आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कास सरपंच प्रविण पंडित, उपसरपंच गजानन पंडित, ग्रा. पं. सदस्य रुक्मिणी पंडित, नीरज पंडित, तलाठी श्रीमती भिंगारे, कोतवाल विनोद धुरी, मडुरा कोतवाल विष्णु वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.