You are currently viewing राजकीय पक्षांतील नेते मंडळींचा शिमगोत्सव दररोज सुरू; जनता कंटाळली

राजकीय पक्षांतील नेते मंडळींचा शिमगोत्सव दररोज सुरू; जनता कंटाळली

*राजकीय पक्षांतील नेते मंडळींचा शिमगोत्सव दररोज सुरू; जनता कंटाळली !*

– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव, मुंबई

शिमगोत्सव संपला की कवित्व बाकी असते असे म्हणतात. पण राजकीय पक्षांमध्ये नेहमीच शिमगोत्सव सुरू असून जनतेला कंटाळा आला आहे. दररोज सकाळी उठून एकमेकांवर कुरघोडी, चिखल फेक कधी टिवटर युद्ध तर कधी दूरदर्शन वाहिनीवरून टिकाटिपणी मग ती भ्रष्टाचार, युगपुरुषाचा अवमान, कोणत्याही सिनेमा न पाहता त्यावर भाष्य करून धमकावणी देणे, कोणी कोणते कपडे परिधान केले यावर आपले मत मांडले जाणे, माध्यमांकडे दादागिरीची भाषा करणे , अशा सारखे प्रकार लोकांना ऐकावे, पाहावे लागत आहेत. खरं तर आक्षेपार्ह घटना घडल्या नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात येते. त्यासंदर्भात छायाचित्रे प्रसिद्ध करता मग पोलिसांना त्यांचे काम करू द्या! पोलिस तुम्हाला यातून कोणता मार्ग काढतात ते पाहणे गरजेचे असताना आम्हाला किती या प्रश्नांचे गांभीर्य आहे हे दाखवून देण्यासाठी धडपडत चालू आहे. यात सवंग प्रसिद्धी मिळते. त्यामुळे जो, तो उठसूठ बेछूट आरोप करत सुटला आहे. आमचे एक प्रकरण काढले ना तुम्ही मग आम्ही दोन प्रकरणे बाहेर काढतो. अशा अघोषित स्पर्धा चालू आहेत. यात मुलभूत प्रश्न मागे पडत आहेत. हे लक्षात घेतले जात नाही.अलिकडे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यामध्ये आमच्या सरकारने हे केले . मागील सरकारने या गोष्टी केल्या नाहीत.असे कित्येक वर्षे दाखवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनातून होताना दिसतो आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांना न्याय कसा मिळेल यावर मंथन अपेक्षित आहे. आता जनता सुज्ञ झाली आहे. राजकीय पक्षांतील नेते मंडळी मतदार राजाला काही कळत नाही. या आविर्भावात सर्व चालले आहे. खऱ्या अर्थाने आता सर्वांनी भानावर या अशी म्हणाची वेळ आली आहे. रोजची महागाई, बेरोजगारी यावर उपाय काढा ! तुमच्या या नाकर्तेपणामुळे निवडणूका मध्ये नोटांचा वापर वाढीस लागला आहे. याकडे दुर्लक्ष करू नका यातच सर्वांचे भले आहे. काळ कुणासाठी थांबत नाही. तुम्हा राजकीय मंडळींसाठी तर तो नाहीच नाही.

– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा