You are currently viewing गोल्डन सायकलिस्ट क्लबची बहुप्रतिक्षित पुणे ते कन्याकुमारी १५०० कि.मी. सायकल स्वारी सफळ संपूर्ण

गोल्डन सायकलिस्ट क्लबची बहुप्रतिक्षित पुणे ते कन्याकुमारी १५०० कि.मी. सायकल स्वारी सफळ संपूर्ण

*गोल्डन सायकलिस्ट क्लबची बहुप्रतिक्षित पुणे ते कन्याकुमारी १५०० कि.मी. सायकल स्वारी सफळ संपूर्ण*

*२४ डिसेंबर २०२२ ते ०१ जानेवारी २०२३ असा केला प्रवास*

अजित नाडकर्णी यांनी गोल्डन सायकलिस्ट क्लबच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाडा पुणे येथून शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ५.४५ वाजता सुरू झालेली गोल्डन सायकलिस्ट पुणे क्लबच्या दहा सायकलवीरांची स्वारी ०१ जानेवारी २०२३ रोजी कन्याकुमारी येथे पोहोचली. कन्याकुमारी येथे पोहोचताच या सायकल वीरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तब्बल १५०२ किलोमीटरचा प्रवास करून कन्याकुमारी येथे ही सायकल यात्रा नवव्या दिवशी सकाळी ८.०० वाजता पोहोचली.
गोल्डन सायकलिस्ट क्लबचे हे दहा सायकलस्वार देशाच्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांच्या काही प्रमुख शहरांमधून तसेच अनेक गावांमधून *जागतिक/देशातील शांतता आणि एकतेचा* संदेश देत पुढे गेले. जागतिक पातळीवरील त्याचप्रमाणे देशातील शांतता आणि एकतेचा संदेश देत पुढे जाणाऱ्या या सायकल स्वारांनी *प्रदूषण मुक्त भारत* आणि *एक भारत श्रेष्ठ भारत* असा नारा विविध शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांकडे घेऊन गेले. या सायकल प्रवासात अनेक शहरांमधून या सायकलस्वारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले गेले. या सायकल यात्रेला पुण्यातील असंख्य सायकलपटूंचा तसेच मावळ अथलेटिक असोसिएशन, सायक्लोहोलिक्स, आयएएस, सनरायझर्स क्लब, सायकल मित्र, बी एफ सी सायकलिस्ट, मोशी सायकलिस्ट, मैवीक सायकल क्लब यासारख्या सायकलिंग संघटनांचे पाठबळ आणि शुभेच्छा लाभल्या होत्या. राजकीय क्षेत्रातून पिंपरी चिंचवडचे माननीय महापौर श्री नितीन आप्पा काळजे, कार्यक्षम नगरसेविका सौ विनयाताई प्रदीपआबा तापकीर आणि विधीज्ञ श्री.कुणाल भाऊ किसनमहाराज तापकीर व इतर अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.


सायकल यात्रेच्या पहिल्या दिवशी सायकल स्वारांनी पुणे ते गोठखिंडी (सांगली) तालुका हे तब्बल २०२ किलोमीटर अंतर कापले. या दिवशी सांगलीतील पै.संदीप पाटील यांच्या गोटखिंडी गावी सायकल पटूंचा जंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार मा. राजू शेट्टी साहेब स्वतः हजर होते. मा. खा.राजू शेट्टी यांनी सायकल यात्रेच्या उद्दिष्टांच, सायकल स्वारांचे व संपूर्ण उपक्रमाचं खूप कौतुक केलं. कराडचे सायकलपटू श्री.सचिन निकम यांनीही उंब्रज येथे सायकल यात्रेचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सायकलपटूंची सायकल यात्रा महाराष्ट्राची सीमा ओलांडून ३५० किमी.प्रवास करत कर्नाटक राज्यात पोहोचली. बेळगाव येथे मुक्काम करून २६ डिसेंबर रोजी तिसऱ्या दिवशी बेळगाव वरून दांडेली.. यल्लापूर.. अंकोला असा १९२ कि.मी. प्रवास करत अंकोला येथे मुक्काम केला. बेळगाव ते अंकोला हे अंतर कापणे खूप चिकाटीचे आणि चित्तथरारक होतं. कारण सदरचा प्रवास हा जवळपास ४० ते ५० किलोमीटर दांडेली जंगलातूनच होता. जिथे आजूबाजूला वाड्या, वस्त्या काहीच नव्हत्या आणि जंगलातून प्रवास करताना दाट अंधार पडला होता. यल्लापूरचा अरबेल घाट उतरणे हा देखील परीक्षेचा काळ होता. जवळपास दहा किलोमीटर घाटाची तीव्र उतरण उतरणे म्हणजे चॅलेंजिंग होती. या घाट रस्त्यातील प्रवासात सायकलपटू आणि डॉ.सचिन बाविस्कर यांची खूप मोलाची मदत झाली.
चौथ्या दिवशीचा प्रवास हा अंकोला ते भटकल असं जवळपास शंभर किलोमीटरचा झाला. या प्रवासा दरम्यान मुरुडेश्वर या प्राचीन शिवमंदिराला देखील सायकलपटूंनी भेट दिली आणि मुरुडेश्वराचे दर्शन घेतले. मुरुडेश्वर दर्शनाला आलेल्या अनेक लोकांनी या सायकलपटूंचे विशेष कौतुक केले. भटकल येथील मुक्कामानंतर भटकल ते कासारगोड (केरळ) असा तब्बल १९० किलोमीटरचा प्रवास उडपी, मेंगलोर सारख्या शहरांमधून झाला. या शहरांमधील रस्ता अतिशय उत्तम दर्जाचा होता. कर्नाटकच्या समुद्री किनाऱ्यालगत नारळ पोफळीच्या बागा आणि उत्कृष्ट बांधकामाचा नमुना ठरणारे बंगले, घरे सायकल स्वारांनी पाहिली. सायकल स्वारीच्या सहाव्या दिवशी कासार गोड ते कोझिकोड म्हणजेच जुने कालिकत बंदर असा १८५ किलोमीटर चा प्रवास झाला. या प्रवासादरम्यान एक चढ संपला की दुसऱ्या चढ समोर उभा ठाकलेला असायचा. त्यातच दुपारच्या रणरणते ऊन आणि सोबतच हवेतील आर्द्रता यामुळे सायकल स्वारांना सायकल चालविणे म्हणजे एक चॅलेंज होते.
या सायकल यात्रेच्या दरम्यान कन्याकुमारी सायकल यात्रेचा कॅप्टन सुरज(किरण) पाटील यांनी सायकलच्या हँडलला छोटा स्पीकर जोडून छान हिंदी गाणी ऐकवली. या गाण्यांच्या रंगात रंगतच सायकल स्वारांचा सायकल प्रवास अगदी आनंदात आणि उत्साहात झाला. उन्हाचा त्रास होत असताना आणि शरीर आद्रतेमुळे घामाने चिपचिपित होत असल्याने डॉक्टर बाविस्कर यांचा थंड पाण्याने पूर्ण भिजून ओलं होण्याचा वॉटर थेरपीचा फंडा कामी येत होता. सायकल यात्रेच्या सातव्या दिवशी कोझिकोड केरळ ते वारापुझा असा १६७ किलोमीटरचा प्रवास करत अनेक समस्यांचा सामना करत सायकल स्वार गुरुवायूर मंदिर येथे पोचले होते. सायकल यात्रेच्या आठव्या दिवशी वारापुझा ते वर्कला बीच (केरळ) असा १७२ किलोमीटरचा प्रवास करत निसर्गरम्य अशा केरळ येथील वर्कला येते सायकल यात्रा पोचली. वर्कला येथे लीजेंडरी क्रिकेटपटू श्री विघ्नेश यांच्या घरी सायकल पटूंचा मुक्काम झाला. तेथे सायकलपटूंना खानपान आराम व्यवस्था ही घरच्यापेक्षाही जंगी अशी होती. सायकल यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे नववा दिवस. ०१ जानेवारीला ओळखला ते कन्याकुमारी असे १३० किलोमीटरचा प्रवास समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने करत सायकल स्वार कन्याकुमारी कडे कुच करत होते. या शेवटच्या टप्प्यात काही चढ अत्यंत कठीण होते. शेवटी कठीण अडचणीतून मार्ग काढत डबल SR निधीश पंधोरिया व शमीक डिसिल्वा हे दोन बिनिचे शिलेदार सर्वप्रथम कन्याकुमारी येथे पोहोचले आणि मोहिमेचा झेंडा रोवला. त्यांच्या पाठोपाठच संदीप मस्के, राईड कॅप्टन सुरज पाटील, संदीप पाटील, SR राकेश पटेल, डॉक्टर सचिन बाविस्कर इत्यादी रायडर पोचले. सर्वांना शेवटपर्यंत सुरक्षितपणे घेऊन जायचं हा वसा उचललेले कोषाध्यक्ष रोहन कोटणीस आणि अध्यक्ष मधुकर मोरे हे योगेश मुंगसे या चीवट सायकल स्वारासह कन्याकुमारीत दाखल झाले. कन्याकुमारी येथे पोहोचताच पंधराशे किलोमीटर अंतर कापून आलेल्या सायकलस्वारांनी एकच जल्लोष केला आणि फोटोग्राफी करत आनंद लुटला.
एकीकडे नवी पिढी दुचाकी आणि चार चाकी गाड्यांमधून प्रवास करत असतानाच तब्बल दीड हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापणारे पुण्यातील सायकलपटू म्हणजे एक आश्चर्य…! पुण्यातील सायकलपटूंनी केलेला सायकल प्रवास नक्कीच नव्या पिढीला प्रेरणादायी असा आहे. वाढते प्रदूषण आणि इंधनाचे वाढते दर व बैठे खेळ आदिंचा विचार केला असता सुखकर आयुष्यासाठी सायकल चालविणे हा कधीही इतर कुठल्याही व्यायामापेक्षा एक उत्तम व संपूर्ण व्यायाम आहे. त्यामुळे *धर हँडल आणि मार पेडल* असा नारा देत पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलने करणाऱ्या सायकलपटूंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा येथील श्री.अजित नाडकर्णी यांनी खास अभिनंदन केले आहे. गोल्डन सायकलिस्ट क्लब पुणेच्या सायकल यात्रेचा कोषाध्यक्ष रोहन विकास कोटणीस हा श्री.अजित नाडकर्णी यांचा जावई आहे. गोल्डन सायकलिस्ट क्लब पुणे यांनी *पुणे ते कन्याकुमारी* या सायकल प्रवासानंतर आपले पुढील ध्येय *पुणे ते काश्मीर* असा उपक्रम लवकरच हाती घेणार असे सांगितले. श्री.अजित नाडकर्णी यांनी गोल्डन सायकलिस्ट क्लबच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + twelve =