बांदा
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आरोस-कळंगुटकरवाडी २.६ किमी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची असलेली मागणी पूर्णत्वास येणार असल्याचे आरोस सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.
आरोस-कळंगुटकरवाडी रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेताना तर तारेवरची कसरत करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा धोकादायक रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. याची दखल घेऊन आरोस सरपंच शंकर नाईक व माजी उपसरपंच सुरेश देसाई यांनी आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी मागणी केली. त्यानुसार मंत्री केसरकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर रस्त्याचे काम होणार असून मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले तसे पत्रही संबंधित विभागाकडून आरोस ग्रामपंचायत येथे आले.
भविष्यात आरोस गावाच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले. तसेच रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आहे शंकर नाईक यांनी केले.