रोणापाल दयासागर छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
बांदा
रोणापाल गावातील युवा उद्योजक प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनामुळे आपण नोकरी न करता व्यवसायात उतरलो आणि आज तीन वर्षे यशस्वीरित्या उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या आहारी न जाता व्यवसायाकडे वळावे. प्रत्यकाने कुठेतरी दातृत्वाची भावना दाखवत कमविलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने उपयोग करावा, असे प्रतिपादन रोणापाल ग्रा.पं.सदस्य नंदकिशोर नेमण यांनी केले.
रोणापाल दयासागर छात्रालयात विद्यार्थ्यांना फॅशन फॉर यू स्टोअरचे मालक तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण यांनी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष बाबुल तुयेकर, तसेच सुदिन गावडे, मंगेश गावडे, निलेश नाईक, राजन परब, शिवा नाईक, राजाराम भोगटे, वामन गावडे, बाबा गावडे, छात्रलयाचे जीवबा वीर सर आदि उपस्थित होते.
आपल्या व्यवसायाला तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झालीत. उद्योजक प्रशांत गावडे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज आपण चांगल्या व्यवसायात आहे. त्यामुळे समाजालाही कुठेतरी आपण देणे लागतो अशी भावना मनात आल्याने छात्रलयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केल्याचे नंदू नेमण यांनी सांगितले.
रोणापाल दयासागर छात्रालयात मुलांना शिस्त, संस्कार मिळतात. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन श्री.नेमण यांनी दातृत्वाची भावना दाखवली, असे प्रकाश गावडे म्हणाले. मंगेश गावडे यांनी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अशा छात्रालयाची मोठी आवश्यकता असून आमचे सर्व सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. दरम्यान, सुदिन गावडे, राजन परब, बाबल तुयेकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिवबा वीर यांनी केले तर आभार बाबल तुयेकर यांनी मानले.