You are currently viewing गेल्या पाच वर्षांतील स्वनिधी खर्चाची चौकशी करा – राष्ट्रवादीची प्रशासक नायर यांच्याकडे मागणी

गेल्या पाच वर्षांतील स्वनिधी खर्चाची चौकशी करा – राष्ट्रवादीची प्रशासक नायर यांच्याकडे मागणी

ओरोस

मागील पाच वर्षात जिल्हा परिषद स्वनिधीतून झालेल्या कामांची चौकशी करावी. या निधीच्या कामांमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. चौकशी अंतिम दोषी आढळतील त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज प्रशासक नायर यांची भेट घेतली.

यावेळी नायर यांना देण्यात आलेल्या निवेदनात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्यांना स्वनिधीच्या नावाखाली आपापल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला गेला. मात्र, कुडाळ तालुक्यातील काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून कुडाळ येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीसह अन्य विकास प्रक्रियेतून खर्च केलेल्या गेल्या पाच वर्षातील संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांची खातेनिहाय चौकशी स्वतंत्र समितीच्या माध्यमातून करण्यात यावी. यामुळे अनेक धक्कादायक माहिती जिल्हा वासियासमोर येईल. यात जे अधिकारी जबाबदार असतील त्यांचे खरे चेहरे नागरिकांना समजतील. त्यामुळे याबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, बाळ कनयाळकर, हार्दिक शिगले, भास्कर परब, नजीर शेख, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा