*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्रांतीज्योती*
प्रवाहाच्या विरोधात
सावित्रीमाई चालली
महिलांना रीत तिने
आचरणात शिकविली
चूल आणि मूल हेच
असे जीणं स्त्री जन्माचं
डोईवर तो घेऊनी पदर
करीतसे काम मरणाचं
मुलीच्या हाती पुस्तक
समजायचे मोठे पाप
दूर केलास तू माई हा
बाईच्या जातीचा शाप
मुलींच्या शिक्षणाचे ते
शिवधनुष्य तिने पेलले
कर्मठाचे शेणही माईने
चंदनासम अंगी झेलले
विधवा होता महिलेने
महापाप कुंकू लावणे
आधाराची असता गरज
अंधाऱ्या खोलीत राहणे
बदल होऊनी समाजात
अजूनही स्त्री बंधनात
परंपरेच्या सोंगापुढे कधी
दिसेल का ती स्वातंत्र्यात?
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
०२/०१/२०२१