You are currently viewing निधी अखर्चित ठेवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली..?

निधी अखर्चित ठेवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली..?

स्थानिक अधिकाऱ्यांपेक्षा परजिल्ह्यातील अधिकारी का प्रिय लोकप्रतिनिधींना..?

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची अवघ्या काही महिन्याच्या कार्यकाळातच सावंतवाडी सा.बा. विभागातून थेट डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे बदली केल्याने अनेक प्रश्न आज लोकांच्या मनात उत्पन्न होत आहेत. सरकारी अधिकारी आणि बदल्या हे फार जुने समीकरण आहे. तुकाराम मुंडे यांच्या तर जेवढी वर्षे नोकरी नाही त्यापेक्षा जास्त बदल्या झालेल्या जनतेने पाहिल्या आहेत. कारण राजकीय लोकांची मर्जी न सांभाळणारे अधिकारी त्यांच्या पचनी पडत नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
सावंतवाडीत बरीच वर्षे परजिल्ह्यातील अधिकारी वर्ग सा.बांधकामाच्या कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. परजिल्ह्यातील अधिकारी हे साधारणपणे तीन वर्षांसाठी येतात, त्यातील कित्येकांना आपला तीन वर्षाचा काळ पूर्ण करायचा असतो. अपवाद वगळता अनेकांना नोकरी म्हणून जिल्ह्यात रहायचे असते, विकासाशी किंवा जिल्ह्याशी काहीही देणेघेणे वा आस्था नसते. त्यामुळे “तेरी भी चूप और मेरी भी चूप” म्हणत आपलेही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे भले करत काम करतात. तीन वर्षांचा काळ घालविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळतात. त्यांना कोण कुठल्या पक्षाचे, कोण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारण किंवा समाजकारण वगैरे करतात याच्याशी काहीही देणेघणे नसते. त्यामुळे सत्ताधारी वर्गाची मर्जी सांभाळून ते काम करतात त्यामुळे बदलीची टांगती तलवार त्यांच्यावर येत नाही.
अशा अधिकारी वर्गात काही असेही असतात जे सिंधुदुर्ग सारख्या छोट्याशा जिल्ह्यात बदली झाल्यावर जिल्ह्यात हजरच होत नाहीत आणि वरिष्ठ पातळीवरून घडामोडी करून बदलीचे ठिकाण बदलून घेतात. काही नाविलाजस्तव जिल्ह्यात येतात आणि काम करत नाहीत कारण त्यांना माहिती असते काम केलं नाही तर राजकीय लोक आपोआप बदली करतील. जिल्ह्यातील राजकीय दबावामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात येण्यासच नाखुश असतात, त्यामुळे कितीतरी वर्षे जिल्ह्यातील महत्त्वाची पदे ही “प्रभारी” अधिकारीच चालवतात त्यामुळे विकासाच्या नावाने बोंबच असते. नाम.दीपक केसरकर पालकमंत्री असताना बाहेरचे अधिकारी ऐकत नाहीत, काम करत नाहीत, निधी खर्च न पडता मागे जातो ही ओरड संपूर्ण जिल्ह्याने पाहीली, ऐकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक अधिकारी यावेत जेणेकरून विकासात अडथळा येणार नाही अशी भावना जिल्हावासियांची व प्रामाणिक लोकप्रतिनिधींची होती. परंतु स्थानिक अधिकारी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता असलेल्या अनामिका चव्हाण यांची अल्प काळात झालेली बदली पाहता “स्थानिक अधिकारी काही राजकीय मंडळींना का नकोत? अनामिका चव्हाण राजकीय लोकांची मर्जी सांभाळण्यात कमी पडल्या का?” असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अनामिका चव्हाण यांच्या बदलीच्या विषयी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना, “जिल्हा परिषदेचा २७ कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने अनामिका चव्हाण यांची बदली झाल्याचे म्हटले आहे. परंतु जिल्हा परिषदेचा निधी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता खर्ची घालणार, मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची बदली का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे. वेंगुर्ला येथील दीपक केसरकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जलबांधेश्वर वेंगुर्ला बंदर व नवाबाग जोडणारा पाच वर्षे रखडलेला झुलता पूल अनामिका चव्हाण यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेला. वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील कुडाळ – मालवण हा अनेक वर्षे “खड्ड्यांचे साम्राज्य” असलेला राज्य महामार्ग त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाला. गेली अनेक वर्षे अगदी घरांचे पावळे गळले तरी पाण्याखाली जाणारा, माणगाव शिवापूर जोडणारा “आंबेरी पूल” कामाला देखील अनामिका चव्हाण यांच्याच काळात गती मिळाली, पुढील मार्च पर्यंत तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू होता. सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागात समाधानकारक कामे होत असताना, जिल्हा परिषदेचा काहीही विषय नसताना अनामिका चव्हाण यांची झालेली बदली नक्कीच राजकीय अनास्था प्रखरपणे दाखवून देत आहे.
सावंतवाडी पर्यंत येणारं एका गॅस कंपनीच्या पाईप लाईनचे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काम “नीचतम” उद्योग करून बंद पाडले जाते, कार्यकारी अभियंत्यांनी ते पुन्हा सुरू केल्यावर पुन्हा आंदोलने होतात आणि अभियंत्यांची बदली होताच तेच काम सुरू होते यामागील गौडबंगाल नक्की काय होते ते त्या राजांनाच माहिती. त्यामुळे काही लोक समाजकारण करतात की सामाजिक कारणे पुढे करून राजकारण करून पोट भरतात हे सुद्धा कोडच आहे.
स्थानिक आमदार आणि मंत्री असलेले नाम.दीपक केसरकर मतदारसंघ विकासाची अनेक स्वप्नं उराशी बाळगून मार्गक्रमण करीत असतात परंतु अनेक बाजूंनी राजकारण होऊन कितीतरी विकासात्मक प्रकल्प केवळ कागदावरच पूर्णत्वास गेलेले दिसतात. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे, परंतु केवळ सत्तेसाठी झालेली युती मनापासून जिल्हा विकासासाठी एकवटणार नाही, एक दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मानणार नाही तोपर्यंत जिल्ह्यात असेच राजकीय खेळ सुरू राहतील. अधिकारी येतील नि जातील आणि जनता विकास शोधत राहील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा