*प्राथ. केंद्रशाळा वेताळ बांबर्डेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश सहदेव सावंत यांचा वेताळ बांबर्डे केंद्राच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार*
वेताळ बांबर्डे / कुडाळ:
शनिवार दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नंबर एक, तालुका कुडाळ या शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश सहदेव सावंत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त ऋणानुबंध सोहळा वेताळ बांबर्डे केंद्राच्या वतीने केंद्र शाळेमध्ये दुपार सत्रात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी वेताळ बांबर्डे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भिकाजी वामन तळेकर, सत्कार मूर्ती सौ व श्री प्रकाश सावंत, प्रथमेश सावंत, वेताळ बांबर्डे केंद्रातील सर्व शिक्षक- मुख्याध्यापक, श्री. संजय बगळे हे उपस्थित होते.
सावंत सर यांच्या नोकरीची सुरुवात सन 1987 पासून कणकवली तालुक्यातून झाली. सन 2012 मध्ये ते तालुका बदली मधून कुडाळ तालुक्यातील केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नंबर एक येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. शिस्तप्रिय, वक्तशीर आणि सेवाभावी वृत्ती अशी सरांची ओळख आहे. त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. त्याचा उपयोग त्यांनी शालेय प्रशासन सांभाळताना, शाळेची भौतिक सुविधांची गरज भागवताना कुशलतेने केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. श्रीमती पल्लवी साईल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ. अदिती मसुरकर यांनी आपल्या सुरेल आवाजात श्री सावंत यांच्यावर आधारीत कविता वाचन केले. त्यानंतर सौ सावंत यांची शिक्षिकांनी खण, नारळ आणि साडी देवून ओटी भरली. श्री सावंत यांना केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. केंद्रप्रमुख श्री तळेकर सर यांनी आणलेले सन्मानपत्र श्री सावंत यांना प्रदान करण्यात आले.
भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या हृद्यसोहळ्यात केंद्रप्रमुख श्री. तळेकर सर, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा सावंत, श्रीमती रश्मी सावंत व श्रीमती रश्मी नेरूरकर तसेच श्री प्रशांत वारंग,श्री पांडुरंग आटक, श्री शंकर गोसावी, श्री चंद्रकांत कदम, सौ स्नेहल सावंत, श्री संजय बगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ व श्री सावंत यांनी देखील आपल्या शैक्षणिक प्रवासातील आठवणी सांगत निरोप समारंभ प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अखेरीस श्रीमती साईल यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्री सावंत यांच्या तर्फे सर्वांना भेटवस्तू तसेच स्नेहभोजन देण्यात आले.