You are currently viewing सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी  सुभाष पुराणिक यांचा गौरव सत्कार सोहळा

सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक यांचा गौरव सत्कार सोहळा

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने कुडाळ येथील आर. एस. एन. हॉटेलमध्ये सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी श्री. सुभाष पुराणिक यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा गौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी “जंगलात गेली अनेक वर्षे काम करताना खुप काही शिकायला मिळाले. त्यामुळे वनखात्यातून निवृत्त झालो असलो, तरी यापुढचा काळ मी जंगल सफर आणि वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी घालविणार आहे,” असा विश्वास निवृत्तीपर मनोगतात बोलताना जिल्हा सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान वनविभागाच्या सेवेत काम करणार्‍या श्री. पुराणिक यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. जंगल आणि वनसंपदा राखण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्यांचे योगदान न विसरता येणार आहे. पुढील काळात सुध्दा त्यांनी आपला प्रवास असाच सुरू ठेवावा, असे मत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. नवाकुमार रेड्डी यांनी व्यक्त केले. ३८ वर्षे वनखात्यात सेवा बजावल्यानंतर श्री. पुराणिक हे सेवेतून निवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रेड्डी यांच्या सह निवृत्त वनअधिकारी दीपक शिरोडकर, सौ. स्नेहा पुराणिक, त्यांच्या मातोश्री मालती पुराणिक, वनविभागचे कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. बेलवडकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना श्री. रेड्डी म्हणाले, शासनाच्या सेवेत प्रामाणिक आणि उत्तम काम करणारे अधिकारी कर्मचारी दुर्मिळ होत चालले आहेत. वनविभागात वन्यजीव आणि वनसंपदा यांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे झटणे आणि आपल्या सहकाऱ्यांना उत्तमप्रकारे मार्गदर्शन करून वनविभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आदर्शवत असे काम श्री. पुराणिक यांनी केले आहे. अशा आदर्शवत अभ्यासू अधिकाऱ्याची प्रेरणा नवोदित वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी. वनाधिकारी सुभाष पुराणिक यांनी ३८ वर्षात वनविभागात जे योगदान दिले ते मोलाचे आहे. पुढील काळात त्यांनी वनविभागाच्या संवर्धन आणि जतनसाठी असेच कार्य करीत राहवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. पुराणिक यांनी प्रामाणिक व आदर्शवत अभ्यासपूर्ण असे उत्तम दर्जाचे अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल त्यांचा वनविभागाच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, कडावल, ओरोस, कणकवली, मालवण, देवगड, वैभववाडी, फोंडाघाट, दोडामार्ग आदी सर्व ठिकाणच्या वनविभागा अंतर्गत तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयांतर्गत सर्व वन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनेही भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा