*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निरोप तुमचा घेतो …*
जातो जातो सुहृदांनो आता निरोप तुमचा घेतो
एक वर्ष बारा महिने म्हणजे तीनशे पासष्ट दिवस होतो…
हात घेऊनी हाती नवी ती स्वप्ने पाहिली होती
सॅारी म्हणतो .. डोळ्या समोर झाली पहा ना माती…
नविन स्वप्ने घेऊन येतो दरवर्षी मी नव्याने
तुमचा होऊन नित्य राहतो राहू म्हणतो सुखाने
सुख देण्याचा नित्य मनी हो असतो पहा विचार
हाती नसते काही पण हो “काळ” करी अविचार ….
संकल्प असती मनी चांगले करीन म्हणतो पूर्ती
तुमच्यावरती आहे ना हो खरोखर ती प्रीती
मनात माझ्या नेहमी चांगले भलाईच चिंतितो
तुम्हा सवे मी हसतो खेळतो नेहमी पहा रमतो…
काही काही गोष्टी पण ना नसती पहा हातात
विधिलिखीत ते घडते जेंव्हा नसते बघा माहित
मी ही जातो चक्राऊन पण करू न शकतो काही
“रेघ काळ्या दगडावरची मुळीच पुसत नाही …”
तुम्हीच म्हणता कठपुतळ्या ना? तुम्हा सवे नाचतो
जे जे घडते मुकाट मी ही तुम्हासवे भोगतो
वरती बसला बाप आपला तोच घडवितो सारे
काहींना पाठवतो खाली, काही वरती या रे …..
गोडच मानून घ्यावे सारे वृथा कशा तक्रार ?
फिरू नये हो डोक्यावरती घेऊन कशाचा भार
आनंदाने जगण्यासाठी दिले जीवन म्हणती
“कर्तृत्वाची लावून जावी जगी एक ती पणती ….”
मनात ठेवू नकाच काही,सुख वाटूनी घ्या हो
स्वच्छ मनाने निरोप घेतो…
गुडबाय … म्हणा हो ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३१ डिसेंबर २०२१
वेळ : संध्या : ६ :१७